शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे (फोटो सौजन्य- ट्वीटर)

Lok Sabha Elections 2019: राष्ट्रवादी काँग्रेस (NCO) पक्षाचे बीड (Beed) येथील आमदार जयदत्त क्षीरसागर (Ncp Mla Jaydatta Kshirsagar) यांच्यासह भारतभूषण क्षीरसागर, बीड जिल्हा परिषद अध्यक्षांनी यांनी शिवसेना (Shiv Sena) पक्षप्रमुखांचे निवासस्थान 'मातोश्री' (Matoshree) येथे हजेरी लावल्याचे वृत्त आहे. आमदार जयदत्त क्षीरसागर, भारतभूषण क्षीरसागर, बीड जिल्हा परिषद अध्यक्ष आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray ) , शिवसेना नेते आदित्य ठाकरे आणि शिवसेना सचिव मिलिंद नार्वेकर यांच्या एक गुप्त बैठक पार पडल्याची चर्चा आहे. या चर्चेचे वृत्त प्रसारमाध्यमांतून बाहेर येताच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गोटात मोठी खळबळ उडाल्याचे समजते.

राष्ट्रवादी काँग्रेसला पुन्हा धक्का बसण्याची शक्यता

लोकसत्ता डॉट कॉमने या भेटीबाबत वृत्त दिले आहे. सोलापूर येथून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते विजयसिंह मोहिते पाटील यांचे चिरंजीव रणजितसिंह मोहिते पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश करुन राष्ट्रवादीला धक्का दिला होता. आता क्षीरसारगर यांच्या 'मातोश्री' भेटीमुळे राष्ट्रवादीला पुन्हा एकदा धक्का बसतो की काय याबाबत चर्चा आहे. गेल्या काही दिवासांत क्षीरसागर यांनी अत्यंत बोलकी आणि सूचक विधाने केली होती. त्या विधानांचा आधार आणि 'मातोश्री' भेट याचा अर्थ काढायचा तर येत्या काळात क्षीरसागर शिवसेनेत प्रवेश करु शकतात अशी चर्चा आहे. दरम्यान, 'मातोश्री'वरील या भेटीचा तपशील बाहेर आला नाही. मात्र, उद्धव ठाकरे यांना गुढी पाडव्याच्या शुभेच्छा देण्यासाठी ही भेट होती, अशी क्षीरसागर यांच्या गोटात चर्चा आहे. (हेही वाचा, उद्धव ठाकरे यांच्या प्रचारसभांचा धडाका; विदर्भ आणि मुंबईमध्ये 7 सभांचे आयोजन)

बीड जिल्हा राजकारणात वेगवान हालचाली

बीडच्या राजकारणात सध्या जोरदार हालचाली सुरु आहेत. राष्ट्रवादीच्या क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे यांची बहीण आणि भारतीय जनता पक्षाच्या लोकसभा उमेदवार प्रीतम मुंडे यांना मदत करण्याची भूमिका घेतली आहे. असे असले तरी त्यांनी स्वत:च्या भविष्यातील राजकीय राजकीय भूमिकेवर मात्र कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही. येत्या 18 एप्रिलला क्षीरसागर हे आपला निर्णय जाहीर करण्याची शक्यात वर्तवली जात आहे. शिवसेना पक्षप्रमुखांची भेट घेतल्याने क्षीरसागर यांची पावले शिवसेनेच्या दिशेने पडत असल्याची चर्चा आहे.

क्षीरसागर यांची धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष टीका

गेल्या महिन्यातच क्षीरसागर यांनी कार्यकर्त्यांची बैठक घेतली होती. या बैठकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार टीका करण्यात आली होती. ‘मागच्या दरातून आलेले, घर फोडणारे, गुंडगिरी करणारे यांना धडा शिकवा,' असे सांगत क्षीरसागर यांनी मुंडे यांच्यावर निशाणा साधला होता. टीकेची धार पाहता क्षीरसागर हे काहीरी मोठा निर्णय घेणार असे, स्थानिक कार्यकर्त्यांतून बोलले जात आहे.