मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 (Lok Sabha Election 2024) साठी जे नियुक्त अधिकारी व कर्मचारी निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास गैरहजर राहिले आहेत, त्यांच्याविरुद्ध लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत फौजदारी कारवाईचा बडगा उचलण्यात येणार असल्याची माहिती मुंबई उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.
मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी 50 हजार अधिकारी आणि कर्मचारी नियुक्त करण्यात आले असून नियुक्त अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसाठी निवडणूकविषयक विविध प्रकारच्या कामकाजासंदर्भातील 5 प्रशिक्षण कार्यक्रम झाले आहेत.
या सर्व प्रशिक्षणांना संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांनी उपस्थित राहणे अनिवार्य असून गैरहजर अधिकारी आणि कर्मचाऱ्यांवर भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकप्रतिधीत्व अधिनियम 1951 अंतर्गत दंडात्मक फौजदारी कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली. मुंबई उपनगर जिल्हा अंतर्गत लोकसभा निवडणूक 2024 साठी सर्व नियुक्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी नियोजित निवडणूक प्रशिक्षण कार्यक्रमास हजर राहणे अनिवार्य असून यासंदर्भातील आदेशाची काटेकोरपणे अंमलबजावणी होईल याची दक्षता सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी घ्यावी, असे आदेश निवडणूक शाखेमार्फत निर्गमित करण्यात आले आहेत.
दरम्यान, लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी राज्यात पाच टप्प्यात निवडणूक होणार आहे. यात नाशिक जिल्ह्यात 20 दिंडोरी आणि 21 नाशिक लोकसभा मतदारसंघासाठी शेवटच्या पाचव्या टप्प्यात 20 मे रोजी मतदान होणार आहे. या अनुषंगाने मतदानाच्या दिवशी मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी भरपगारी सुट्टी किंवा काही ठिकाणी कामाच्या तासात योग्य सवलत देण्यात येणार आहे. मतदारांनी मतदानासाठी मिळालेल्या सुटीचा व सवलतीचा फायदा घेऊन अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जलज शर्मा यांनी केले आहे.