Mahayuti Dindori | Twitter

लोकसभा निवडणूकीचा रणधुमाळी आता रंगात आली आहे. उमेदवारी वरून सार्‍याच पक्षात रस्सीखेच सुरू असताना नाराज उमेदवारांकडून बंडखोरी होत आहे. दिंडोरी मध्येही महायुतीत बंडखोरी झाली आहे. केंद्रीय राज्यमंत्री डॉ.भारती पवार यांना भाजपने दुसऱ्यांदा दिंडोरीतून उमेदवारी दिल्याने नाराज माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. आज महायुतीचे राज्यातील प्रमुख नेते देवेंद्र फडणवीस नाशिकमध्ये असताना युतीच्या उमेदवाराचा अर्ज दाखल करताना हरिचंद्र चव्हाण यांनी देखील आपला अपक्ष उमेदवारी अर्ज दिंडोरीतून दाखल केला आहे.

हरिश्चंद्र चव्हाण हे 3 वेळेस दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून निवडून आले आहेत. मात्र मागील निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देता भारती पवार यांना उमेदवारी दिली आणि नंतरही त्यांनी 5 वर्षात पक्षात किंवा विकास कामात सामावून घेतले नसल्याचे सांगत आज हरिश्चंद्र चव्हाण यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला आहे. बीजेपी च्या भारती पवार यांना हरिश्चंद्र चव्हाण यांच्या उमेदवारीने मतदार संघात मत विभागणीमुळे धक्का बसण्याची चर्चा सुरू आहे.

केंद्रीय मंत्री भारती पवार यांच्या विरूद्ध महाविकास आघाडी कडून भास्कर भगरे यांचे आव्हान आहे. आता भाजपा कडून हरिश्चंद्र चव्हाण यांच्या मनधरणीचे प्रयत्न होणार का? हे पहावं लागणार आहे. हरिश्चंद्र चव्हाण यांनी मागील पाच वर्षात राजकीय पुर्नवसनही न झाल्याने पक्षावर नाराज असल्याची चर्चा आहे.