Chief Minister Uddhav Thackeray | (Photo Credits: Twitter)

महाराष्ट्रात (Maharashtra) कोरोना विषाणूने थैमान घातला आहे. राज्यात दिवसेंदिवस कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ होत असताना राज्यातील नागरिकांना दिलासा देणारी माहिती समोर आली आहे. राज्यात सर्वाधिक कोरोनाबाधित रुग्ण मुंबई आणि पुण्यात आढळून आली आहेत. मुंबईतील रुग्णांचा संख्या वाढत असली, तरी रुग्ण दुप्पटीचा कालावधीत मोठी घट झाली आहे. त्याचबरोबर मृत्यूदरही कमी झाला असून, बऱ्या होणाऱ्या रुग्णांचे प्रमाण वाढले असल्याची माहिती आदित्य ठाकरे यांनी दिली. याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची नुकतीच पत्रकार परिषद पार पडली आहे. महत्वाचे म्हणजे, राज्यात येत्या 30 जूननंतर लॉकडाउन (Lockdown) पूर्णपणे उठवला जाणार का? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. यासंबंधी बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जर शिथीलता जीवघेणी ठरत आहे असे वाटले तर आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागू शकतो असा इशारा दिला आहे. तसेच कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील नागरिकांनी योग्य ती काळजी घ्यावी, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

निसर्ग वादळामुळे फटका बसलेल्या कोकणासाठी मदत जाहीर करण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. त्यावेळी त्यांनी लॉकडाउनबाबतही चर्चा केली आहे. आपल्याला खूप सावध राहून पुढे जगावे लागणार आहे. सरकार अतिशय सावधगिरीने पावले टाकत आहे. कुठेही घाई, गर्दी होऊ नये. ज्याप्रमाणे लॉकडाउन आपण टप्प्याटप्प्याने लागू केला त्याचप्रमाणे शिथीलता आणत आहोत. अजूनही संकट टळलेले नाही. अजूनही लढा संपलेला नाही. करोनासोबत लढत असताना अर्थचक्र बंद करुन चालणार नाही, असे उद्धव ठाकरे म्हणाले आहेत. तसेच कोरोनासोबत जगायला शिका असे जगभरात सांगितले जात आहे. सरकारने निर्बंध शिथील केल्यानंतर जी काही झुंबड उडाली ती पाहून थोडी धाकधूक वाटली. आरोग्यासाठी व्यायाम करायला मिळावा, यासाठी बाहेर पडायची परवानगी दिली गेली आहे. मात्र, आपण एकमेकांपासून अंतर ठेवले पाहिजे, असेही ते म्हणाले आहेत. हे देखील वाचा- Maharashtra Monsoon Session 2020: विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन 3 ऑगस्टपासून सुरु; सरकारच्या निर्णयाला भाजपचा पाठिंबा- देवेंद्र फडणवीस

दरम्यान, सार्वजनिक सेवा अद्यापही सुरु केलेल्या नाहीत. सरकार एकूण परिस्थितीचा अंदाज घेत आहे. पण जर ही उघडीप जीवघेणी ठरते आहे असे लक्षात आले तर, नाइलाजाने आपल्याला पुन्हा लॉकडाउन करावा लागेल. परंतु, महाराष्ट्रातील जनता सरकारला सहकार्य करत आहेत, असे बोलत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेचे आभार मानले आहे.