
अमरावती (Amravati) जिल्ह्यातील लॉकडाऊनमध्ये (Lockdown) पुन्हा एकदा वाढ करण्यात आली आहे. लॉकडाऊन कालावधीत कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या कमी न झाल्याने अमरावती जिल्ह्यातील लॉकडाऊन 8 मार्चपर्यंत वाढवण्यात आला आहे. 21 फेब्रुवारी रोजी जिल्ह्यात एकदिवसीय लॉकडाऊन होता. त्यानंतर 22 फेब्रुवारी ते 1 मार्च पर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला. मात्र तो टप्पा संपण्यापूर्वीच लॉकडाऊनच्या कालावधीत पुन्हा एकदा वाढ करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी दिली आहे. दरम्यान, या काळातही पूर्वीप्रमाणेच जीवनावश्यक सुविधा सुरु राहणार आहेत. ABP माझाने या संदर्भातील वृत्त दिले आहे. (Coronavirus in Pune: कोविड-19 रुग्णांची वाढती संख्या पाहता पुण्यात येत्या 8 दिवसांत 'हे' निर्बंध लागू होण्याची शक्यता)
लॉकडाऊन काळात अमरावतीमध्ये एकूण 4061 कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळून आले होते. तर 32 रुग्णांचा मृत्यू झाला होता. त्यामुळे पुन्हा एकदा लॉकडाऊनचा कालावधी वाढवण्यात आला आहे. तसंच लॉकडाऊन वाढवून घ्यायचा नसेल तर कोरोना नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.
लॉकडाऊन कालावधीतही रुग्णसंख्या वाढत असल्याने अमरावतीतील नागरिक नियम पाळत नाहीत का? पालिका, जिल्हा प्रशासन नियमांची अंमलबजावणी करण्यात कमी पडतंय का? असे सवाल उपस्थित केले जात आहेत.
दरम्यान, नियमांचे पालन न करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येत आहे. आतापर्यंत अनेक जणांकडून पोलिसांनी लाखो रुपयांचा दंड वसूल केला आहे. तरी देखील विनाकारण बाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी झालेली नाही.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या मागील काही काळापासून वाढत आहे. त्यामुळे अनेक जिल्हे, शहरं याठिकाणी कडक नियम लागू करण्यात आले आहेत. तसंच राज्यात लॉकडाऊन करण्याबाबत सरकारने 8 दिवसांचा अल्टिमेटम दिला असून 'नियम पाळा आणि लॉकडाऊन टाळा' असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे.