Dolphins (Photo Credits: Pixabay)

रत्नागिरी (Ratnagiri), सिंधुदूर्गमध्ये (Sindhudurg) डॉल्फिनचं दर्शन झाल्यानंतर काही दिवसांपूर्वी मुंबईमध्ये वरळीत (Worli) डॉल्फिनचं दर्शन झालं होतं. मात्र आज सकाळी नालासोपाराच्या राजोडी बीचवरही (Rajodi Beach) स्थानिकांना डॉल्फिन (Dolphin) पहायला मिळाले. काहींनी हे क्षण कॅमेर्‍यामध्ये कैद केले आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार मागील काही दिवसांपासून या समुद्र किनार्‍यावर डॉल्फिन पहायला मिळाले आहेत. यामुळे पर्यटकांची गर्दीदेखील वाढत आहे. Bandra - Worli Sea Link जवळ दिसले हम्पबॅक जातीचे डॉल्फिन

पालघर येथील राजोडी बीच हा मागील वर्षी 25 डिसेंबरपासून सुरू करण्यात आला आहे. या बीचवर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी काही वॉटर स्पोर्ट्सदेखील खुले करण्यात आले आहेत. यामध्ये Jet Ski, बनाना राईड (Banana Ride) यासारखे खेळ खुले करण्यात आले आहेत. ब्लू राईड अ‍ॅडव्हेंचर या कंपनीला या वॉटर स्पोर्ट्ससाठी लायसन्स देण्यात आले आहे. आठवडाभर डॉल्फिनचं दर्शन होत असल्याने स्थानिकांसोबतच पर्यटकही खूष आहेत.

सकाळी अकराच्या सुमारास स्थानिकांना डॉल्फिन खेळताना दिसले. सुमारे 4-5 डॉल्फिन असतील असा स्थानिकांचा अंदाज आहे. राजोडी बीचवर अशाप्रकारे डॉल्फिन दिसण्याची ही पहिलीच वेळ आहे.