नागपूर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या बदली विरोधात स्थानिकांची सरकारविरोधात जोरदार निदर्शने, बदली मागे घेण्याची केली मागणी
Nagpur Protest For Tukaram Mundhe (Photo Credits: Twitter/ANI)

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे (Tukaram Mundhe) यांची तडकाफडकी बदली केल्या प्रकरणी येथील स्थानिक नागरिक संतप्त झाले असून सरकारविरोधात जोरदार निदर्शने (Protest) करण्यासाठी रस्त्यावर उतरले आहेत. तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश मागे घेण्यात यावे अशी मागणी जोर धरली जात असून मुंढेच्या समर्थनार्थ सरकारी निवासस्थानाबाहेर येथील नागरिकांनी प्रचंड गर्दी करत जोरदार घोषणाबाजी केली. कडक शिस्तीचे, प्रामाणिकपणे आपले काम करणारे दबंग आयुक्त तुकाराम मुंढे यांची ओळख आहे. अशा सच्च्या आयुक्तांची बदली आम्हाला अमान्य आहे अशी घोषणाबाजी मुंढेंचे समर्थक देताना दिसले.

तुकाराम मुंढे यांच्या बदलीच्या आदेशानंतर त्यांनी फेसबुकवर एक व्हिडीओ पोस्ट केला. यात त्यांनी नागपूरकरांचे आभार मानले. “अब मै चल पडा मेरे राह की ओर….”अशा शब्दात तुकाराम मुंढे यांनी नागपूरकरांचा निरोप घेतला. Tukaram Mundhe Transfer: नागपूर महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांची महाराष्ट्र जीवन प्राधिकरण सदस्य सचिव पदावर बदली

दरम्यान नागपूरकरांनी रस्त्यावर उतरून सरकारविरोधात जोरदार निदर्शने केली. त्यांची बदली मागे घ्यावी अशी घोषणाबाजीही केली. यादरम्यान येथील निदर्शकांमध्ये आणि पोलिसांमध्ये बाचाबाचीही झाली.

जानेवारी महिन्यातच नागपूरचे महापालिका आयुक्त म्हणून तुकाराम मुंढे यांची बदली झाली होती. त्यानंतर अवघ्या सात महिन्यात त्यांची पुन्हा एकदा ट्रान्स्फर ऑर्डर निघाली. आता त्याला पुन्हा एकदा ब्रेक बसला आहे. तर त्यांच्याकडे असलेल्या नागपूर महापालिका आयुक्तपदाचा कारभार राधाकृष्णन बी. यांच्याकडे सोपवण्यात आला आहे.