मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी यांचे  केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल यांना पत्र
MP Gopal Shetty (PC - ANI)

मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळण्यासाठी खासदार गोपाळ शेट्टी (Gopal Shetty)यांनी केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री प्रल्हाद सिंह पटेल (Pralhad Singh Patel) यांना पत्र लिहिलं आहे. या पत्रात गोपाळ शेट्टी यांनी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याचा त्वरित निर्णय घ्यावा, अशी विनंती केली आहे.

आतापर्यंत तमिळसह संस्कृत, तेलुगू, कन्नड, मल्याळम, ओडिआ या भाषांना अभिजात भाषेचा दर्जा मिळाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अनेक नेत्यांनी केंद्र सरकारकडे यापूर्वी मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्याची मागणी केली आहे. दरम्यान, 2019 मध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा देण्यात यावा आणि यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: लक्ष घालून तातडीने आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्याचे निर्देश संबंधितांना द्यावे, अशी विनंती पत्राद्वारे केली होती. (हेही वाचा - मुंबई बद्दल अभिनेत्री कंगना रनौत हिने केलेल्या विधानानंतर लोकशाहीतील प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार; सत्तेत असणाऱ्या शिवसेनेने धमकी देणे योग्य नाही- रामदास आठवले)

अभिजात भाषेचा दर्जा मिळविण्यासाठी आवश्यक निकष मराठी भाषा पुर्ण करते. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्याबाबत अनेकदा पाठपुरावा करूनही हे प्रकरण केंद्र सरकारच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाकडे प्रलंबित आहे, असे ठाकरे यांनी पत्रात म्हटलं होतं. याशिवाय राष्ट्रवादीचे खासदार सुनील तटकरे यांनीदेखील मागील वर्षी लोकसभेत मराठी भाषेच्या अभिजात दर्जाचा प्रश्न उपस्थित केला होता.