| Representational image (Photo Credits: pxhere)

Lek Ladki Yojna Criteria: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत आज 'लेक लाडकी योजना' राबविण्याच्या निर्णयास मान्यता देण्यात आली. या बैठकीस मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्रीही उपस्थित होते. अर्थात या योजनेचा लाभ घेण्यासाठी काही निकषही लागू करण्यात आले आहेत. हे निकष पाहिले तर समाजातील सर्वच घटकांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही. केवळ ज्यांचे वार्षिक उत्पन्न एक लाख रुपयांपेक्षाही कमी आहे, अशा लोकांनाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. शिवाय योजनेतील लाभार्थ्यांना मिळणारी रक्कम ही एकदम नव्हे तर टप्प्याटप्याने मिळणार आहे.

योजना कोणासाठी?

पिवळ्या व केशरी रेशनकार्डधारक कुटुंबात मुलगी जन्माला आल्यास या योजनेचा लाभ घेता येणार आहे. योजनेच्या लाभासाठी आवश्यक बाबींची पूर्तता झाल्यानंतर मुलीच्या जन्मावेळी 5,000 रुपये, ती इयत्ता पहिलीत गेल्यावर 6,000 रुपये पुढे इयत्ता सातवीमध्ये गेल्यावर 7,000 रुपये, 11 वीमध्ये गेल्याव 8,000 रुपये, मुलीला 18 वर्षे पूर्ण झाल्यावर 75, 000 रुपये असे सर्व मिळून लाभार्थी मुलीस 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहेत.

योजना कधीपासून लागू केली जाणार

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय भाषणामध्ये या योजनेचा उल्लेख केला होता. ज्याची पूर्तता करण्याच्या दृष्टीने राज्य सरकारने पाऊल टाकले आहे. प्राप्त माहितीनुसार, अधिकक्रमित करुन 1 एप्रिल 2023 पासून ही 'माझी कन्या भाग्यश्री' ही योजना राबविण्यात येईल.

योजना सुरु करण्याचा उद्देश

राज्यात खालावलेला मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी, मुलींच्या शिक्षणासाठीचालना देणे, त्यांचा मृत्यूदर कमी करणे शिवाय बालविवाहांना चाप लावणे, मुलींमधील कुपोषण कमी करणे या उद्देशाने ही योजना कार्यन्वित केली जाणार आहे.

कोणाला भेटेल लाभ?

ज्या कुटुंबात 1 एप्रिल 2023 जन्माला आलेल्या एक किंवा दोन मुलींना लाभ मिळेल. ज्या कुटुंबात एक मुलगा आणि एक मुलगी असेल त्या कुटुंबातील मुलीलाही या योजनेचा लाभ मिळेल. ज्याकुटुंबात पहिल्यांदाच जुळ्या मुली जन्माला आल्या तर त्या दोन्ही मुलींना स्वतंत्रपणे योजनेचा लाभ मिळेल. मात्र, त्यानंतर सदर जोडप्याने कुटूंबनियोजन शस्त्रक्रीया करणे आवश्यक आहे. काही जोडप्यांना आगोदर एक अपत्य असते. मात्र, ते जेव्हा अपत्यप्राप्तीची दुसरी संधी घेतात तेव्हा त्यांना जुळी मुले राहतात. अशा प्रकरणात जर एक मुलगी जन्माला आली तर तिला आणि जर दोन मुली जन्माला आल्या तर दोघींनाही स्वतंत्रपणे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.