Latur ST Bus Accident Video | (Photo Credit-X)

दुचाकीस्वारांना वाचवण्याच्या प्रयत्नात एसटी बसचा धक्कादायक अपघात (St Bus Accident) झाला आहे. ही घटना लातूर - नांदेड राज्य महामार्गावर (Latur Nanded Road State Highway) नांदगावपाटी जवळ सोमवारी (3 मार्च) दुपारी दोनच्या सुमारास घडली. अपघात (Bus Accident) घडला तेव्हा धावत्या बसमध्ये 48 प्रवासी होते. त्यातील 36 प्रवासी गंभीर जखमी झाल्याची माहिती आहे. अपघाताची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये कैद झाली आहे. ज्यामध्ये बस रस्त्यावर पलटी होताना दिसत आहे. अपघात इतका भीषण आहे की, जखमी प्रवाशांपैकी सहा जणांची प्रकृती अत्यावस्थ असल्याचे वृत्त आहे. अपघाताची माहिती मिळताच स्थानिक पोलीस आणि प्रशासन तातडीने घटनास्थळी दाखल झाले. स्थानिक नागरिक आणि प्रशासनाने तातडीने मदत आणि बचावकार्य सुरु केले. ज्यामुळे जखमींना वैद्यकीय मदत मिळाली.

बस रस्ता-दुभाजकाला धडकल्याने उलटली

बस अपघातात जखमी झालेल्या सर्वांना लातूर येथील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरु आहेत. एकूण जखमींची संख्या 36 इतकी आहे. त्यापैकी सहा जणांची प्रकृती अतिशय गंभीर आहे. तसेच, जखमींपैकी काहींचे अवयव तुटले आहेत. काहींचे पाय तर काहींचे हात खांदा किंवा कोपरापासून तुटले आहेत. काहींची प्रकृती धोकादायक स्थितीतून बाहेर आली आहे. अपघात घडण्यापूर्वी ही बस चाकूर येथून लातूरच्या दिशेने निघाली होती. लातूर - नांदेड राज्य महामार्गावर असलेल्या नांदगाव पाटीजवळ आली तेव्हा या बसला अपघात घडला. वस वेगाने निघाली असता एक दुचाकीस्वार अचानक बससमोर आला. त्याचे प्राण वाचविण्याच्या प्रयत्नात चालकाने बस वळवली मात्र बसला झोला बसला आणि ती रस्तादुभाजकाला धडकली आणि रस्त्यावरच उलटली. रस्त्यावर उलटलेली ही बस जवळपास 50 फूट अंतरावर घासत गेल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले.

सहा जणांनी गमावले अवयव

शासकीय रुग्णालयातील डॉक्टर उदय मोहिते यांनी माहिती देताना सांगितले की, रुग्णलयात अपघातग्रस्त झालेल्या 36 जखमींवर उपचार सुरु आहेत. त्यातील सहा ते सात जणांनी आपले अवयव गमावले आहेत. काही जण अत्यावस्त आहेत. त्या सर्वांवर सर्वोपचार रुग्णालयात उपचार केले जात आहेत. डॉक्टरांचे एक पथक या सर्व रुग्णांवर लक्ष ठेऊन आहे. जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर घुगे यांनी देखील प्रशासनाला सूचना केल्या असून, जखमींवर काळजीपूर्वक लक्ष ठेवण्याबाबत त्यांनी वैद्यकीय विभागास सांगितले आहे.

दरम्यान, अपघातग्रस्त नागरिकांना तत्काळ मदत करणे आवश्यक आहे. आपणासही अपघातग्रस्त लोक आढळून आल्यास तातडीने मदत पोहोचविण्यास प्राधान्य द्या. सर्वात आधी जवळच्या वैद्यकीय सेवेशी संपर्क करा. पीडितांना वैद्यकीय मदत आणि मानसिक आधार कसा मिळेल यास प्राधान्य द्या. तातडीने पोलिसांशी संपर्क करा आणि त्यांना पाचारण करण्याचा प्रयत्न करा.