उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खेरी (Lakhimpur Kheri) येथे भाजप (BJP) कार्यकर्ते आणि आंदोलन करणारे शेतकरी यांच्यामध्ये झालेल्या झटापटीमध्ये काही शेतकऱ्यांचा मृत्यू झाला आहे. या घटनेचे पडसाद देशभर उमटले असून, विरोधी पक्षाने भाजपवर सडकून टीका करायला सुरुवात केली आहे. आता राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणाचा निषेध करत, ही जालियनवाला बाग हत्याकांडासारखी (Jallianwala Bagh Massacre) परिस्थिती असल्याचे म्हटले आहे. मंगळवारी त्यांच्या दिल्लीतील निवासस्थानी माध्यमांशी बोलताना शरद पवार म्हणाले, ‘आज उत्तर प्रदेशात जालियनवाला बागसारखी परिस्थिती झाली आहे.’
ते पुढे म्हणाले ‘ही घटना शेतकरी विसरणार नाहीत. केंद्र सरकारला असंतोषाला सामोरे जावे लागेल. भाजप सरकारच्या ताफ्याने शेतकऱ्यांची हत्या केली आहे. शेतकऱ्यांच्या हत्येला उत्तर प्रदेश सरकार आणि केंद्र सरकार जबाबदार आहे.’ या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करत शरद पवार म्हणाले, ‘यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशांची समिती स्थापन केली जावी आणि तपास केला जावा. सत्तेचा दुरुपयोग होत आहे.’
रविवारी लखीमपूर खेरी येथे झालेल्या हिंसाचारात शेतकऱ्यांसह 8 जण ठार झाल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशचे उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य एका कार्यक्रमाला उपस्थित राहण्यासाठी लखीमपूरला येत होते, त्याविरोधात शेतकरी आंदोलन करत होते.
राष्ट्रवादी, काँग्रेस, समाजवादी पक्ष, बहुजन समाजवाद, टीएमसी, आम आदमी पार्टी, एमआयएमसह अनेक विरोधी पक्षांनी या घटनेबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. पीडित कुटुंबाला भरपाई आणि नोकरी देण्याबरोबरच सर्वोच्च न्यायालयाच्या विद्यमान न्यायाधीशाच्या अध्यक्षतेखाली चौकशी करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, लखीमपूर खेरी येथील हिंसाचाराबाबत सध्या देशात राजकीय गदारोळ मजला आहे. सीतापूरमध्ये पोलीस नजरकैदेत ठेवलेल्या काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांच्याद्वारे शांततेचा भंग होण्याची भीती असल्याने आता त्यांना अटक करण्यात आली आहे. प्रियांका गांधीविरोधात भादंविच्या कलम 151, 107, 116 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.