Ladki Bahin Yojana | (Photo credit: archived, edited, representative image)

Ladki Bahin Yojana Update: लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) म्हणजे सरकार आणि लाभार्थी महिला अशा दोन्ही बाजूला अडचणींचा विषय ठरली आहे. तिजोरीवरील वाढता भार ही सरकारची चिंता तर आपण घेतलेला लाभ निकषात बसणारा आहे किंवा नाही, आपल्यावर कोणती कारवाई होणार का? ही लाभार्थ्यांमधील चिंता. त्यामुळे अनेक लाभार्थी महिलांनी या योजनेच्या पुढील लाभावरील आपला दावा सोडला आहे. निकषात न बसणाऱ्या इतरही महिलांनी तो सोडावा, असे सरकारकडून अवाहन केले जात आहे. या पार्श्वभूमीवर आपणासही या योजनेचा लाभ नको असेल, तुम्हालाही हा दावा सोडायचा असेल (How to Withdraw Ladki Bahin Yojana Application?) तर त्यासाठी एक पद्धत उपलब्ध करुन देण्यात आली आहे. जाणून घ्या ही पद्धत.

चार हजार महिलांनी सोडला दावा?

लाडकी बहीण योजना महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावर लोकप्रिय असली तरी, पहिल्या काही हप्त्यांप्रमाणे जानेवारी (2025) महिन्याचा हप्ता वेळेत आला नाही. त्यामुळे हा हप्ता मिळणार की नाही याबाबत चर्चा सुरु असतानाच अनेक महिलांनी हा दावा सोडावा असे सरकारचे अवाहन आहे. या योजनेसाठी दाखल केलेल्या अर्जांची पडताळणी, छाननी केली जाणार आहे. त्यानंतर ज्या महिला पात्र ठरतील त्यांनाच या योजनेचा लाभ निकषानुसार दिला जाईल, असे सरकार म्हणते. निकषाबाहेर जाऊन लाभ घेतलेल्या महिलांकडून वसूली केली जाईल, असेही सरकरचे समर्थक सांगतात. अशा वेळी पडताळणीपूर्वीच अनेक महिलांनी योजनेवरील दावा सोडला आहे. अशा महिलांची संख्या चार हजार असल्याचे सांगितले जात आहे. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: 'लाडकी बहीण योजना' नको गं बाई! वसूलीची भीती; चार हजार महिलांचे अर्ज मागे)

योजनेचा लाभ नको असेल तर काय कराल?

लाडकी बहीण योजना लाभार्थी आहे पण आता त्यांना आता योजनेतून बाहेर पडायचे आहे, पुढील लाभ सोडायचा आहे, अशा महिलांनी काय करावे? असा सवाल अनेक लाभार्थी विचारतात. त्यांच्यासाठी एक प्रक्रिया आहे. योजनेचा लाभ नको असलेल्या महिला आपल्या तालुक्यातील बालविकास प्रकल्प अधिकारी कार्यालय, जिल्ह्यातील महिला व बालकल्याण अधिकारी आणि जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय आदी ठिकाणी लेखी अर्ज करु शकतात. ज्या महिला डिजिटल साक्षर आहे त्या https://ladakibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊ शकतात. या संकेतस्थळावरील 'तक्रार निवारण' या पर्यायावर क्लिक करा. पुढे येणाऱ्या आणि अनिवार्य असलेल्या सर्व बाबींची पूर्तता करुन ऑनलाईन पद्धतीनेही आपणास योजनेचा लाभ सोडता येईल.  (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: लाडकी बहीण योजना, लाखो महिलांना अर्ज अपात्र होण्याची भीती; सत्ताधारी भाऊराया काय करणार?)

जानेवारी महिन्यातील हाप्ता कधी?

नव्या वर्षाचे धुमधडाक्यात स्वागत झाले. लाडक्या बहिणींनी मकर संक्रात सणही साजरा केला. परंतू, सरकार नामक भाऊरायाने अद्यापही लाडकी बहीण योजना द्वारे मिळणारा या महिन्याचा हप्ता दिला नाही. त्यामुळे जानेवारी महिन्यातील हप्ता केव्हा मिळणार अशी विचारणा होऊ लागली आहे. या पार्श्वभूमीवर राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी माहिती देताना सांगितले की, जानेवारी महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लाडकी बहीण योजनेच्या विद्यमान महिन्यातील हप्त्याचे वितरण केले जाईल. मात्र, ज्या महिला निकषात बसणार नाहीत अशा महिलांनी स्वत:हून प्रति महिना मिळणारे दीड हजार रुपये नाकारायला हवेत असेही त्या म्हणाल्या.