
लाडकी बहीण योजना (Ladki Bahin Yojana) लाभार्थ्यांसाठी यंदाचा जागतिक महिला दिन ( 2025) विशेष असणार आहे. कारण, फेब्रुवारी महिन्यात थकीत राहिलेला हप्ता या दिवशी वितरीत करण्यात येणार असल्याची माहिती राज्य सरकारने दिली आहे. राज्याच्या महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी प्रसारमाध्यमांसी बोलताना सांगितले की, या योजनेच्या लाभार्थ्यांच्या फेब्रुवारी महिन्यातील पैसे सात मार्च म्हणजेच महिला दिनाच्या पूर्वसंध्येला जमा करण्यात येतील. अर्थात फेब्रुवारी महिन्याचा विषय निकाली काढण्यात आला असला तरी, मार्च महिन्याच्या हप्त्याबाबत मात्र त्यांनी मौनच बाळगले आहे.
फेब्रुवारी महिन्यात पैसे वितरण नाही
जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येला हे पैसे महिलांच्या खात्यवर येणार असले तरी, ते फक्त निकषात बसणाऱ्या आणि पात्र महिलांच्या खात्यावरच येतील, असे सांगायलाही मंत्री अदिती तटकरे विसरल्या नाहीत. लाडकी बहीण योजना लाभाचा इतिहास पाहता, जेव्हापासून योजना सुरु झाली तेव्हापासून प्रत्येक महिन्यात लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट हस्तांतरण प्रक्रियेद्वारे, निधी जमा करण्यात आला. शक्यतो प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या आठवड्यात सरकार लाभार्थ्यांच्या खात्यावर प्रत्येकी 1500 रुपये जमा करत असे. फेब्रुवारी 2025 मात्र त्यास अपवाद ठरला आणि संपूर्ण महिना उलटून गेला तरी लाभार्थ्यांना या महिन्यातील पैसे काही मिळाले नाहीत. अर्थात, हा महिना नेहमीसारखा 30 किंवा 31 दिवसांचा नव्हता तर तो 28 दिवसांचा होता, त्यामुळेही सरकारला काही अडचणी आल्या असाव्यात असे योजनेचे समर्थक सांगतात. पण, वास्तव असे की, लाभार्थ्यांना पैसे मिळालेच नाहीत. (हेही वाचा, Ladki Bahin Yojana: आज,उद्या म्हणत महिना संपला! लाडकी बहीण योजना लाभार्थ्यांना कधी मिळणार पैसे?)
एकाच महिन्यात डबल बार? लाभार्थ्यांना मिळणार तीन हजार?
फेब्रुवारी महिन्यातील हप्ता मार्चमध्ये मिळणार हे तर स्पष्ट झाले. पण, अनेकांनी तर्क लावला की, राज्य सरकार डबल बार काढण्याच्या विचारात आहे. ज्यामुळे फेबुवारी आणि मार्च अशा दोन्ही महिन्यातील मिळून 3000 रुपयांचा एकच हप्ता लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा केला जाईल. मात्र, राज्य सरकारकडून मात्र त्याबाबत अद्याप कोणतेही भाष्य केले नाही. (हेही वाचा, Government Scheme: राज्य सरकार 'नाईलाज योजना' राबविण्याच्या तयारीत, विविध विभागांना आदेश)
दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होत आहे. राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार हा अर्थसंकल्प सादर करतील. विविध योजनांमुळे आमच्यावर ताण नक्कीच आहे. पण अतिशय संतुलीत असा अर्थसंकल्प आम्ही सादर करु. विरोधक टीका, आरोप आणि दावे करत आहेत त्यात तथ्य नाही. लाडकी बहीण योजना बंद होणार नाही, असेही फडणवीस म्हणाले.