L&T Sea Bridge Marathon 2024

L&T Sea Bridge Marathon 2024: जेव्हा मुंबई ट्रान्स हार्बर लिंकचे (Mumbai Trans Harbour Link) उद्घाटन करण्यात आले, तेव्हा भारतातील सर्वात लांब सागरी पुलावर ड्रायव्हिंगचा आनंद घेण्यासाठी अनेकांनी या पुलावरील लाँग ड्राईव्हची योजना आखली होती. आता या अटल सेतूवर चक्क मॅरेथॉन स्पर्धा (Marathon on Atal Setu) आयोजित केली आहे. येत्या रविवारी, 18 फेब्रुवारी रोजी मुंबईमधील सागरी सेतूवर विविध श्रेणींमध्ये मॅरेथॉनचे आयोजन करण्यात आले आहे. लार्सन अँड टुब्रो, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (MMRDA) आणि टाइम्स ऑफ इंडिया यांच्या संयुक्त विद्यमाने, एल अँड टी ‘सी ब्रिज मॅरेथॉन 2024’ चे आयोजन करत आहे.

मुंबई ट्रान्स हार्बर लिंकवरील मॅरेथॉनमध्ये 5,000 हून अधिक स्पर्धक सहभागी होणार आहेत. यातील सुमारे 85% सहभागी मुंबईतील आहेत. ही अशा प्रकारची पहिलीच मॅरेथॉन आहे, जिथे सी लिंक रेसिंग ट्रॅकमध्ये बदलताना दिसेल.

या स्पर्धेत चार शर्यतींचे प्रकार असतील. सर्वात मोठी 42 किलोमीटर मॅरेथॉन सकाळी 5 वाजता सुरू होईल. यानंतर सकाळी 6 वाजता हाफ मॅरेथॉन आणि 6:30 वाजता 10 किलोमीटरची मॅरेथॉन घेतली जाईल. शेवटी, 5 किलोमीटरची रन देखील असेल जी सकाळी 6:45 वाजता सुरू होईल. मात्र, आता शर्यतींची नोंदणी बंद करण्यात आली आहे. मात्र, आपण रविवारी कार्यक्रमाच्या ठिकाणी होणाऱ्या चालण्याच्या कार्यक्रमात भाग घेऊ शकता. (हेही वाचा: Bus Services on Mumbai Trans Harbor Link: पुढील आठवड्यापासून NMMT अटल सेतूवर सुरु करणार बस सेवा; जाणून घ्या दर, मार्गासह इतर माहिती)

ही मॅरेथॉन केवळ ऍथलेटिक स्पर्धा असण्यापलीकडे, शहरामध्ये कनेक्टिव्हिटी आणि प्रगती वाढवण्याचा सामूहिक प्रयत्न आहे. अशाप्रकारे सी ब्रिज मॅरेथॉनने मुंबई मेट्रोपॉलिटन रिजन (MMR) मधील प्रतिष्ठित मॅरेथॉन स्पर्धांच्या यादीत भर घातली आहे. दरम्यान, अटल सेतू हा माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या नावावर असलेला, देशातील सर्वात लांब सागरी पूल आणि जगातील 12 वा सर्वात लांब पूल आहे.