Kurla Railway Station (PC -Wikimedia Commons)

Kurla Station: नुकत्याच प्रसिद्ध झालेल्या एका स्वयंसेवी संस्थेच्या अहवालानुसार, कुर्ला रेल्वे स्थानक (Kurla Railway Station) आता शहराच्या हद्दीतील रेल्वे प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनले आहे. गेल्या पाच वर्षांत या स्थानकात 1,982 मृत्यू झाले आहेत, तर बोरिवली रेल्वे स्थानकात सर्वाधिक प्रवासी जखमी झाले आहेत. 2022 मध्ये रुळांवर सर्वाधिक मृत्यू (43 टक्के) रेल्वे रुळ ओलांडताना झाले, त्यानंतर रेल्वेतून पडून (28 टक्के) मृत्यू झाले. रेल्वे अधिकारी प्लॅटफॉर्मवर कुंपण आणि इतर नियमांची अंमलबजावणी करून मृत्यू टाळण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करत आहेत. परंतु प्रवाशांनी देखील सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

यासंदर्भात प्रजा फाऊंडेशनने अहवाल सादर केला आहे. या संस्थेने मुंबई शहर आणि उपनगरीय हद्दीतील रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या मृत्यू आणि जखमींवर प्रकाश टाकला आहे. गेल्या पाच वर्षांपासून कुर्ला रेल्वे स्थानक प्रवाशांसाठी मृत्यूचा सापळा बनल्याचे फाउंडेशनने प्राप्त केलेल्या आकडेवारीवरून स्पष्ट झाले आहे. (हेही वाचा - Navi Mumbai Metro: जवळजवळ 68,000 हून अधिक प्रवाशांनी केला नवी मुंबई मेट्रोने प्रवास; केवळ 5 दिवसांत वाहतूक समस्या झाली कमी)

कुर्ला रेल्वे स्थानकावर विविध कारणांमुळे 1,982 प्रवाशांनी आपला जीव गमावल्याची आकडेवारी समोर आली आहे, त्यानंतर बोरिवली रेल्वे स्थानकावर 977 प्रवाशांनी आपला जीव गमावला आहे. प्रवाशांच्या दुखापतींबाबत, बोरिवली अव्वल क्रमांकावर असून स्थानकावर 964 प्रवासी जखमी झाले आहेत, तर मुंबई सेंट्रल रेल्वे स्थानकावर 920 प्रवासी जखमी झाले आहेत.

रेल्वे अधिकार्‍यांनी दावा केला की, मुंबईतील अधिकारी अशा प्रकारचे अपघात रोखण्यासाठी अतिक्रमण नियंत्रण कार्यक्रम, फूट ओव्हरब्रिज बांधणे आणि प्रवाशांचे समुपदेशन करणे यावर काम करत आहेत. पश्चिम रेल्वेवर 140 हून अधिक फूट ओव्हर ब्रिज आहेत, त्यापैकी 13 एकट्या 2022 मध्ये बांधले गेले आहेत. सेंट्रल लाईनमध्ये 206 FOB आहेत. अधिक FOB नियोजित केले आहेत. जर प्रवाशांनी ट्रॅक ओलांडणे टाळले आणि या एफओबीचा वापर केला तर मृत्यूची संख्या नक्कीच कमी होईल, असं एका अधिकाऱ्याने सांगितले.

आकडेवारीनुसार, 2022 मध्ये बोरिवलीमध्ये सर्वाधिक मृत्यू झाले. कॅलेंडर वर्षात स्टेशनवर एकूण 240 प्रवाशांचा मृत्यू झाला, तर कुर्ला रेल्वे स्थानकावर 233 प्रवाशांचा मृत्यू झाला. बोरिवली येथे 240 मृत्यूंपैकी 140 मृत्यू लाइन ओलांडल्यामुळे झाले. कुर्ल्यामध्ये रूळ ओलांडल्याने 101 जणांचा मृत्यू झाला आहे.

असे मुख्य जनसंपर्क अधिकारी डॉ. शिवराज मानसपुरे यांनी सांगितले की, आम्ही ट्रॅक क्रॉसिंग टाळण्यासाठी रुळांमध्ये कुंपण घातले आहे. नियमित घोषणा केल्या जात आहेत. प्रवाशांना रुळ ओलांडण्यापासून तसेच उपनगरीय लोकलमधून बाहेर पडण्यापासून रोखण्यासाठी पोलिस कर्मचारी देखील नियुक्त केले जातात. तरीही अपघात होत असून प्रवाशांना जीव गमवावा लागत आहे.