Stand-Up Comedian Kunal Kamra and Maharashtra Deputy CM Eknath Shinde (Photo Credits: X/@kunalkamra88)

स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराच्या (Kunal Kamra) एका शोवरून मोठा वाद निर्माण झाला आहे. कुणाल कामराचा एक व्हिडिओ मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे, ज्यामध्ये तो राजकीय विनोद करताना दिसत आहे. या व्हिडिओमध्ये त्याने उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याबद्दल अपमानास्पद भाषा वापरल्याचा दावा केला जात आहे. यानंतर शिवसेना शिंदे समर्थक संतप्त झाले आणि त्यांनी कामराच्या मुंबई स्टुडिओची तोडफोड केली. एकनाथ शिंदे यांच्यावर कुणाल कामराने केलेल्या वक्तव्याविरुद्ध शिवसेनेने कडक भूमिका घेतली आहे. शिवसेनेचे आमदार मुरजी पटेल यांनी कुणालविरुद्ध अंधेरी पूर्व येथील एमआयडीसी पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल केला आहे, तसेच त्यांनी कुणालला 2 दिवसांत माफी मागण्याचा इशारा दिला आहे.

मुरजी पटेल म्हणाले की, आमचे नेते आणि महाराष्ट्राचे डीसीएम एकनाथ शिंदे यांच्याविरुद्ध केलेल्या टिप्पणीबद्दल आम्ही कुणाल कामराविरुद्ध एफआयआर दाखल केला आहे. आम्ही त्याच्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे. तीक्ष्ण आणि स्पष्टवक्त्या विनोदासाठी ओळखल्या जाणाऱ्या कुणाल कामराने त्याच्या एका स्टँड-अप शोमध्ये एक गाणे सादर करत  एकनाथ शिंदेंवर काही विनोद केले होते. हे विनोद शिंदे यांच्या राजकीय प्रवासावर आणि त्यांच्या अलीकडील निर्णयांवर आधारित होते. कुणालने त्यांच्याविरुद्ध ‘गद्दार’ या शब्दाचा वापर केला होता.

कुणाल कामराचे गाणे-  

एकनाथ शिंदे यांचे निष्ठावंत समर्थक मुरजी पटेल यांनी हा त्यांच्या नेत्याचा अपमान मानला. त्यानंतर आता पटेल यांनी कुणाल कामराविरुद्ध तक्रार दाखल केली. मुरजी यांनी पोलिसांना सांगितले की, हा केवळ एका विनोदी कलाकाराचा विनोद नाही, तर आमच्या नेत्याची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न आहे. आम्ही हे सहन करणार नाही. पोलिसांनी त्यांच्या तक्रारीवरून ताबडतोब एफआयआर नोंदवला आणि तपास सुरू करण्याचे आश्वासन दिले. (हेही वाचा: Sanjay Raut on Narayan Rane: नारायण राणे यांचा उद्धव ठाकरे यांना फोन, संजय राऊत यांची माहिती)

कामराच्या मुंबई स्टुडिओची तोडफोड-

दुसरीकडे हा व्हिडीओ समोर आल्यानंतर रविवारी मुंबईतील खार परिसरातील हॉटेल युनिकॉन्टिनेंटलमध्ये शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी तोडफोड केली. स्टँड-अप कॉमेडियन कुणाल कामराचा शो याच हॉटेलमध्ये चित्रित झाला होता. दरम्यान, शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेच्या गटाने कामराच्या अटकेची मागणी करत कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. जर विनोदी कलाकाराने जाहीर माफी मागितली नाही, तर पुढील कायदेशीर परिणाम भोगावे लागतील असा इशाराही पक्षाने दिला आहे. कुणाल याधीही अनेकदा राजकीय नेत्यांवर केलेल्या तीव्र टीकांमुळे वादात सापडला आहे.