Kranti Redkar's Letter To CM Uddhav Thackeray: क्रांती रेडकर चं पती समीर वानखेडेंवरील आरोप-प्रत्यारोपांवरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र; 'एक मराठी माणूस म्हणून न्यायाची अपेक्षा'
Kranti Redkar | PC: Twitter

मुंबई‌‌ ‌- गोवा क्रुझ वर ड्रग्स पार्टी एनसीबी ने उधळल्यानंतर दिवसागणिक या प्रकरणामध्ये नवनवे खुलासे होत आहेत. काही दिवसांपूर्वी एनसीबी झोनल डिरेक्टर समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांच्यावरही घोटाळ्याचे आरोप झाले आहेत. सध्या या प्रकरणाची एनसीबी कडून चौकशी सुरू असतानाच समीर वानखेडे यांच्या पत्नी आणि मराठी अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) हीने आता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्याकडे दाद मागितली आहे. क्रांतीने एक पत्र सोशल मीडीयात ट्वीट करत “एक मराठी माणूस म्हणून आज मी तुमच्याकडे न्यायाच्या अपेक्षेने पाहतेय, तुम्ही योग्य तो न्याय करा,” अशी विनंती असा आर्जव तिने केला आहे.

महाविकास आघाडी मधील मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर त्यांनी सरकारी नोकरी मिळवण्यासाठी खोटी जात प्रमाणपत्र सादर केल्याचा आरोप लावला आहे. त्यांनी समीर वानखेडेंच्या जातप्रमाणपत्राची आणि पहिल्या लग्नाच्या निकाह नामाची प्रत पोस्ट केली होती. मात्र वानखेडे कुटुंबाने हे दावे फेटाळले आहेत. समीर वानखेडे जन्मतः हिंदू असल्याचा त्यांचा दावा आहे. नक्की वाचा: नवाब मलिक यांच्या आरोपांवर अभिनेत्री Kranti Redkar कडून पतीची पाठराखण, म्हणाली- 'मी आणि माझा नवरा समीर वानखेडे जन्मतः हिंदू आहोत' (See Tweet) .

क्रांती रेडकर ट्वीट

'आमचा काहीही संबंध नसताना रोज सकाळी आमच्या अब्रूची लख्तर चार चौघात उधळली जातात. शिवरायांच्या राज्यात एका स्त्रीच्या गरिमेचा खेळ करुन ठेवला आहे….विनोद करुन ठेवला आहे. आज बाळासाहेब असते तर त्यांना हे नक्कीच पटलं नसतं….एका महिलेवर आणि तिच्या परिवारावर होणारे खासगी हल्ले हे राजाकारणांच किती नीच स्वरुप आहे, हे नेहमीच त्यांच्या विचारातून आमच्यापर्यंत पोहोचलेलं आहे. आज ते नाही पण तुम्ही आहात…त्यांची सावली त्यांची प्रतिमा आम्ही तुमच्यात बघतो…' अशी भावनिक साद क्रांती ने पत्रातून घातली आहे.

सध्या एनसीबी दिल्लीच्या 5 सदस्यीय समितीकडून समीर वानखेडेंची चौकशी सुरू आहे. आज त्यांचा जबाब नोंदवला जाणार आहे.