Railway | Image used for representational purpose | (फोटो सौजन्य-फेसबुक)

अवघ्या काहीच दिवसांवर येऊन ठेपलेल्या पावसाळ्यासाठी कोकण रेल्वेने (Konkan Railway)  विशेष सुरक्षा पवित्रा स्वीकारला आहे. प्रवासाच्या दरम्यान दरड कोसळणे, खराब हवामान यामुळे उभ्या राहणाऱ्या समस्यांवर तोडगा म्हणून तब्बल 630 सुरक्षा जवानांची तुकडी नियुक्त करण्यात येणार असून, रेल्वेच्या सुरळीत वाहतुकीवर लक्ष ठेवण्यासाठी ही तुकडी रेल्वेमार्गाला लागून असलेल्या परिसरात गस्त घालणार आहे. तसेच कोलाड (Kolad) ते ठोकूर (Thokur)  स्थानकांच्या दरम्यान वेगवान जलनिस्सारण प्रक्रियेचे काम पूर्ण करण्यात आले आहे जेणेकरून पावसाळ्यात पाणी तुंबण्याची समस्या उद्भवणार नाही.

कोकण रेल्वेच्या अतिसंवेदनशील स्थानकावर आपतीजन्य परिस्थितीत मदतीसाठी 24 तास सुरक्षा पुरवणारी मानवी यंत्रणा तैनात करण्यात येईल. याचप्रमाणे पावसाळयात खराब हवामानाचा फटका बसू नये यासाठी सर्व चालकांना ट्रेनची गती 40 किमी प्रतिताशी इतकी ठेवण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सोबतच रत्नागिरी व वर्णा स्थानकांच्या जवळ प्राथामिक उपचारापासून ते ऑपरेशन थेटर पर्यंत सुविधा असणाऱ्या अद्ययावत रुग्णवाहिका उपलब्ध असतील. प्रवाशांच्या सोयीसाठी बेलापूरसह रत्नागिरी येथे 24 तास नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे. रेल्वेकडून प्रवाशांसाठी भेट; 'कोकण रेल्वे' मार्गावर उभी राहणार नवी 10 स्टेशन्स 

पावसाळी वेळापत्रक, कोकण मार्गावरील धावणाऱ्या मेल-एक्स्प्रेसचे वेळपत्रक आणि अन्य माहिती प्रवाशांना मिळावी यासाठी कोकण रेल्वेने 139 हा निःशुल्क हेल्पलाइन क्रमांक उपलब्ध केल्याची माहिती कोकण रेल्वेने दिली. आपत्कालीन परिस्थितीत संपर्क साधण्यासाठी ट्रेनचे चालक, सुरक्षा रक्षक व स्टेशन मास्टर यांना प्रत्येक स्थानकावर वॉकी टॉकी मशिन्स देण्यात येतील. प्रतिकूल हवामानात दृश्यमानतेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याने महत्वाचे सिग्नल्स हे एलईडी सोबत बदलण्यात येतील. खुशखबर! गणेशोत्सवानिमित्त कोकणात जाण्यासाठी विशेष 166 गाड्या, 25 मे पासून बुकिंग; जाणून घ्या वेळापत्रक

यंदा पावसाळ्यात कोकण रेल्वेवर गणपती दरम्यान 166 गाडयांची विशेष वाहतूक वाढवण्यात येणार आहे. त्यासाठी तयार करण्यात येणाऱ्या या सुरक्षा यंत्रणेमुळे प्रवाश्यांचा त्रास कमी होण्याची सुचिन्ह दिसत आहेत.