कोकणवासियांसाठी म्हाडाचं (MHADA Konkan Board) हक्काचं घर घेण्याचं स्वप्न आता अंतिम टप्प्यामध्ये आलं आहे. मागील काही महिने लांबणीवर पडलेला सोडत काढण्यासाठीची तारीख अखेर जाहीर करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांच्या हस्ते ठाण्यामध्ये 24 फेब्रुवारी दिवशी सोडत काढली जाणार आहे. कोकण विभागातील सुमारे 5311 घरांसाठीची सोडत जाहीर केली जाणार आहे. यासाठी 24 हजारापेक्षा अधिक अर्ज आले आहेत.
कोकण विभागातील घरांसाठी सोडत 3 वेळा तारीख देऊनही मागे-पुढे झाली होती. प्रशासकीय कारण देत म्हाडाने ही सोडत पुढे ढकलली होती पण आता 24 फेब्रुवारीला अखेर ती सोडत जाहीर केली जाणार आहे. नक्की वाचा: MHADA Lottery: खुशखबर, म्हाडाच्या 11 हजार घरांच्या किमती होणार कमी; गृहनिर्माण मंत्री अतुल सावेंनी केली घोषणा .
कोकण विभागामध्ये 5311 घरांसाठी 15 सप्टेंबरपासून अर्जाची खरेदी विक्री आणि अर्ज स्विकारण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. 17 नोव्हेंबर पर्यंत या प्रक्रियेमध्ये 31433 जणांनी अर्ज सादर केले. अनामत रक्कमेसह अर्ज सादर करणारे 24303 जण पात्र ठरले आहेत. आता ही प्रक्रिया पूर्ण झाली असून म्हाडा कोकण मंडळ सोडतीसाठी सज्ज झाले आहे. ही सोडत 7 नोव्हेंबरला होणार होती. पण कोकण मंडळाने अर्जविक्री-स्वीकृतीला मुदतवाढ दिल्याने 7 नोव्हेंबरची सोडत पुढे ढकलून 13 डिसेंबरला सोडत काढण्याचे मंडळाने त्यावेळी जाहीर केले होते. मात्र ती तारीख देखील बदलण्यात आली.
घरांसाठी सोडत जाहीर केल्यानंतर भाग्यवान विजेत्यांची यादी प्रसिद्ध जाईल. घर ज्यांना जाहीर झाले आहे त्यांना SMS द्वारा निकाल कळवला जातो. म्हाडाच्या वेबसाईट वर निकालाच्या संध्याकाळी प्रतिक्षायादी देखील जाहीर होते. घराची पसंती झाल्यानंतर पुढील प्रक्रिया पूर्ण केली जाते. हा निकाल म्हाडाच्या अधिकृत युट्युब चॅनल वरून देखील प्रसारित केला जातो. त्यामुळे ज्यांना ऑफलाईन निकाल पाहता येत नाही अशी मंंडळी ऑनलाईन देखील निकाल बघू शकतात.