Konkan Flood | (Photo Credit: Twitter)

रायगड (Raigad ) जिल्ह्यात मुसळधार पावसाचा जोरदार फटका बसला आहे. त्यामुळे अनेक गावे पाण्यात गेली आहेत. महाड शहराला तर पुराचा वेढाच पडला आहे. एनडीआरएफचे जवान आणि प्रशासन नागरिकांना मदत आणि बचावकार्य पोहोचवत आहेत. दरम्यान, पूरग्रस्त ठिकाणांना भेट देण्यासाठी विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर (Pravin Darekar) आणि आमदार गिरीश महाजन (Girish Mahajan), आमदार निरंजन डावखरे यांच्यासह काही भाजप नेते निघाले होते. हे नेते रस्तेमार्गे माणगाव (Mangaon) जवळ असलेल्या तासगाव टोल नाक्यापर्यत पोहोचू शकले. मात्र, पुढे रस्त्यावर जवळपास सहा फूट इतक्या मोठ्या प्रमाणावर पाणी असल्यामुळे त्यांना तिथेच अडकून राहावे लागले. दरम्यान, या परिसरातील नागरिकांचीही तशीच स्थिती पाहायला मिळाली. पुराच्या पाण्यापासून जीव वाचविण्यासाठी नागरिकांनी बसचे छत, उंच ठिकाणांचा आश्रय घेतला.

मानगाव येथील नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफची एक टीम पोहोचली. त्यांनी नागरिकांची मदत केली. या वेळी प्रविण दरेकरांनी प्रशासन आणि नागरिकांशी संवाद साधत परिस्थितीची माहिती घेतली. प्रविण दरेकांनी या वेळी माध्यमांशी बोलताना सांगितले की, आम्हाला पुढे जाण्यास अटकाव करण्यात आला आहे. आता पुढील प्रवास बोटीने करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आमच्यासोबत बचाव दलही आहे. दरम्यान, एनडीआरएफच्या बोटीने पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असे दरेकर म्हणाले.

रायगड जिल्ह्यात मुसळधार पाऊस संततधार बरसतो आहे. आतापर्यंत रायगड जिल्ह्यात 5 जणांचा मृत्यू झाल्याचे वृत्त आहे.महाड शहरात पाणी साचल्याने जनजिवन विस्कळीत झाले. एनडीआरएफचे जवान शहरात पोहोचले आहेत. एनडीआरएफच्या जवानांनी हेलिकॉप्टरमधून पाहणी करत नागरिकांना अन्नाची पाकिटं दिली. तसेच, पुराच्या पाण्यात कोणी अडकले आहे का याचाही शोध सुरु आहे. रात्री अचानक मोठ्या प्रमाणावर पाऊस पडल्याने शहरात पाणी शिरले अनेक घरांच्या दुसऱ्या मजल्यांपर्यंत पाणी पोहोचले. अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत. भूस्कलनाच्या घटनाही घडल्या आहेत. काही ठिकाणी दरडी कोसळल्या आहेत. पूरजन्य स्थितीमुळे नागरीक भयभीत झाले आहेत. नागरिक मिळेल त्या पद्धतीेन सुरक्षीततेचा आश्रय घेत आहेत. जनजीवनही विस्कळीत झाले आहे. प्रशासन आणि एनडीआरएफचे जवान युद्ध पातळीवर मदत आणि बचाव कार्य पोहोचविण्याचा प्रयत्न करत आहेत.