Rain | Image used for representational purpose | (Photo Credits: @NarimanPatel/ Twitter)

देशापुढे कोरोनाचं संकट असताना आता राज्यातील विविध भागात अवकाळी पावसाची शक्यता वर्तवण्यात येत आहे. राज्यात पुढील 5 दिवसात कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, विदर्भ मुंबई आणि पुण्यात पावसाचा अंदाज (Precipitation Forecast) वर्तवण्यात आला आहे. भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार या ठिकाणी हलका ते मध्यम स्वरुपाचा तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

याशिवाय काही ठिकाणी वादळीवारा आणि विजेच्या कडकडाटसह पाऊस पडण्याची शक्यता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांपुढं आणखी एक संकट उभ ठाकलं आहे. सध्या राज्यात गहु आणि ज्वारीच्या कापणीचे काम सुरू आहे. अशात अवकाळी पाऊस झाल्यास शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास वाया जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं आर्थिक नुकसान होणार आहे. (हेही वाचा - Coronavirus: केंद्रीय विद्यालयातील 1 ली ते 8 पर्यंतच्या सर्व विद्यार्थ्यांना पास करणार; केंद्रीय विद्यालय संघटनेचा निर्णय)

भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार, कोकणात पुढील 6 दिवस हलका ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच मुंबईत 27 व 28 मार्चला काही ठिकाणी हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. याशिवाय मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.

दरम्यान, विदर्भात 25 ते 28 मार्चच्या दरम्यान हलक्‍या ते मध्यम स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच काही ठिकाणी गारपीटीची शक्यताही वर्तवण्यात येत आहे. सध्या राज्यात कोरोना व्हायरसचा संसर्ग वाढत आहे. अशात शेतकऱ्यांपुढं दुसरं संकट आ वासून उभं आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या चिंतेत आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.