Tomato ( Image Credit -Pixabay)

सध्या राज्यासह देशभरात टोमॅटोच्या किंमती या गगनाला पोहचल्या आहेत. सध्या देशात टोमॅटोच्या किमती या 150 ते 200 रुपये किलोच्या दरम्यान आहे. मात्र चोरटे कधी टोमॅटो (Tomato) ही चोरी करतील असा कोणी विचार केला नव्हता. एरवी सहज उपलब्ध होणारा आणि दररोज भाज्यांमध्ये दिसणारा टोमॅटो आता सर्वसामान्यांच्या आवाक्या बाहेर गेल्याने चोरांनी चक्क टोमॅटो चोरीलाही सुरुवात केली आहे. असाच एक प्रकार कोल्हापुरात उघडकीस आला. कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड येथील शेतकरी अशोक मस्के यांच्या शेतातली 50 हजारांच्या टोमॅटोची चोरी झाली आहे. या टोमॅटो चोरट्यांनी वीस गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरुन नेले आहे.  (हेही वाचा - Chandrapur Flood: विदर्भातील वर्धा नदीला पूर, वर्धा नदीच्या काठावरील नागरिकांना सर्तकेचा इशारा)

अशोक मस्के यांच्या शेतात टोमॅटोचे पीक घेण्यात आले होते. अंधार आणि पावसाचा फायदा घेत तसेच सीसीटीव्हीला चकवा देत चोरट्यांनी टोमॅटोची चोरी केली. या टोमॅटो चोरट्यांनी वीस गुंठ्यातील 25 कॅरेट टोमॅटो चोरुन नेले आहे.  अंधाराचा फायदा उचलून टोमॅटो नेल्याने शेतकरी हवालदिल झाला असून या  प्रकरणी आता पोलीस तपास हा सुरु करत आहे.

दरम्यान गोंदिया शहरात एका भाजी विक्रेत्याच्या दुकानातून देखील टोमॅटो चोरीला गेल्याची घटना घडली आहे. चोरट्यांनी जवळपास तीन ते चार हजार रुपयाचे टोमॅटोसह मिरची आणि रोकड ही चोरीला गेल्याची तक्रार त्यांनी गोंदिया पोलीस स्टेशनमध्ये दिली. टोमॅटो चोरीची ही घटना बाजारपेठेतील दुसऱ्यांदा घडली आहे. तक्रारीनंतर पोलिसांनी तपास करून चोराला अटक केली आहे.