Puja | PC: Pixabay.com

कोल्हापूरच्या (Kolhapur) शिरोळ (Shirol) गावामधील टाकळवाडीने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक देत राज्याला पुन्हा पुरोगामी विचारांची दिशा दाखवली आहे. आता याच गावाने 'ताईबाई मंदिरा'च्या वास्तुशांतीच्या पूजेमध्ये विधवांना मान देत वास्तुशांतीच्या कार्यक्रमात देवीच्या ओटीभरणी व विधिवंत पूजा करण्याचा मान त्यांना बहाल केला. या कार्यक्रमात शोभा विठ्ठल निर्मळे, चंदाबाई आप्पासाहेब निर्मळे, रेशमा बजरंग निर्मळे आणि सरिता विलास निर्मळे यांनी सहभाग घेतला होता.

शिरोळ तालुक्यातील हेरवाड या गावाने विधवांना सन्मानाची वागणूक देण्याचा ठराव मे महिन्यात पारित केला. पुढे हा ठराव महाराष्ट्र राज्यातही लागू करण्यात आला. हेरवाडचं कौतुक होत असताना आता टाकळवाडी गावानेही विधवांच्या हस्ते वास्तूशांती केल्याने त्यांच्या कृतीची चर्चा होत आहे. हे देखील नक्की वाचा: Herwad Pattern: विधवा प्रथा बंदीसाठी 'हेरवाड पॅटर्न' राज्यभर राबवा, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे ग्रामपंचायतींना अवाहन, जिल्हा प्रशासनालाही आदेश .

टाकळवाडी मध्ये चर्मकार समाजाच्या ताईबाई मंदिराच्या जीर्णोधाराचा नुकताच कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये आज (3 जून) मंदिराची वास्तूशांती पुजा, देवीची ओटी भरणं तसेच हळदी कुंकवाच्या कार्यक्रमामध्येही महिलांना स्थान देण्यात आले होते.

धार्मिक कार्यक्रमात विधवांना सहभागी न करून घेण्याची अनिष्ट प्रथा बंद करत त्यांना मान देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. आता या प्रथेची अंमलबजावणी देखील होताना दिसत आहे.