महाराष्ट्रातील कोल्हापूर (Kolhapur) -सांगली (Sangli) येथे निर्माण झालेल्या पुरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. मात्र आता पुरस्थिती ओरसत चालली असली तरीही नागरिकांचे अतोनात हाल झाले आहेत. या पुराचा फटका शाळा-महाविद्यालयांना सुद्धा बसल्याने त्याच्या पुर्नस्थापनासाठी विविध स्तरातून मदतीचा हात पुढे केला जात आहे.
पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना आता बालभारती (Balbharati) कडून पुस्तकांची मदत केली जाणार आहे. जवळजवळ 1 लाखापेक्षा अधिक पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत देण्यात येणार आहेत. बालभारतीने ही पुस्तके पाच जिल्हा परिषद आणि दोन महानगरपालिका यांच्याकडे दिली आहेत. तर विद्यार्थ्यांना तत्काळ पुस्तके उपलब्ध करुन देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे.(पुरग्रस्तांसाठी मुंबई विद्यापीठाकडून 25 लाखांची मदत जाहीर, नुकसान झालेल्या शैक्षणिक साहित्याचे वाटप करणार)
बालभारतीकडून इयत्तेनुसार पुस्तकांचे वाटप करण्यात येणार आहे. तर काही दिवसांपूर्वी पुरग्रस्त भागातील विद्यार्थ्यांना शाळेच्या गणवेशाची सक्ती करु नये असा सुद्धा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच मुंबई विद्यापीठानेसुद्धा कोल्हापूर-सांगली येथील विद्यार्थ्यांना मदतीचा हात पुढे करत पुस्तकांचे वाटप करणार असल्याचे जाहीर केले आहे.