कोल्हापूर येथे मटणाच्या किंमतीत जबरदस्त वाढ झाल्याने बेमुदत काळासाठी विक्री बंद
Mutton recipes (Photo Credits: Youtube)

कोल्हापूर येथे गेल्या काही दिवसांपासून मटणाच्या किंमतीत वाढ होत असल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट दिसून येत आहे. तर शहरातील दर 600 रुपयापर्यंत पोहचल्याने स्थानिकांनी याबात जिल्हाधिकाऱ्यांकडे धाव घेतली. त्यानंतर मटणाच्या दरावरुन दुकानदारांना त्याचे दर कमी करा अन्यथा दुकाने बंद करा अशी नोटीस बजावली होती. एवढेच नाही तर नागरिकांनी वाढलेल्या मटणाच्या किंमतीमुळे आंदोलन केले होते. त्यानंतर आता बेमुदत काळासाठी कोल्हापूर येथे मटण विक्री करण्यास बंदी घालण्यात आली आहे.

तर काही दिवसांपूर्वीच एकीकडे मटणाचे दर वाढल्याने सार्वजनिक मंडळींच्या वतीने त्यांचे स्टॉल उभे करत स्वस्त दरात मटणाची विक्री केली. त्यामुळे मटण विकणाऱ्या नेहमीच्या दुकानदारांकडची गर्दी कमी झाल्याचे दिसून आले होते. तांबडा आणि पांढरा रस्सा हा कोल्हापूरकरांचा जीव की प्राण. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मटण तब्बल 600 रुपये किलोने विकले जात आहे. याबाबत काहीतरी पावले उचलावीत यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विनंती केली होती. त्यानंतर मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशी नोटीस विक्रेत्यांना बजावण्यात आली. याबाबत संतापलेल्या विक्रेत्यांनी हायकोर्टात धाव घेतली. विक्रेत्यांकडून अॅड. धैर्यशील सुतार यांनी कोर्टात याचिका दाखल केली होती.(कोल्हापुरातील मटनाचा वाद न्यायालयात)

या याचिकेवर निकाल देत, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने ग्रामपंचायती व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मागे घेण्याची नोटीस पाठवली. तसेच अधिकार नसताना दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला याबाबत खुलासाही मागितला आहे. दरम्यान, मटणाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. मंगळवारी (10 डिसेंबर) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मटणाला 480 रूपये किलो हा दर विक्रेत्यांनी मान्य करण्यात आला होता.