कोल्हापुरातील मटनाचा वाद न्यायालयात; ग्रामपंचायत व जिल्हाधिकाऱ्यांना कोर्टाची नोटीस
Mutton (Photo Credits: Youtube)

गेल्या काही दिवसांपासून कोल्हापुर (Kolhapur) येथे मटणाच्या दरावरून (Mutton Price) वाद चालू आहेत. कोल्हापूर शहर आणि परिसरात मटणाचा दर 600 ते 560 रुपये किलो इतका चालू आहे. मात्र ग्राहकांनी इतका जास्त दर देण्यास नकार दिला आहे. अखेर याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना लक्ष घालावे लागले. मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशा आशयाची नोटीस मटण विक्रेत्यांना बजावली. याबाबत न्यायालयाने जिल्हाधिकारी आणि ग्रामपंचायतींना चांगलेच फैलावर घेतले आहे. अधिकार नसताना केलेल्या अशा प्रकारच्या कारवाईचा खुलासा करावा असा आदेश न्यायालयाने दिला आहे.

तांबडा आणि पांढरा रस्सा हा कोल्हापूरकरांचा जीव की प्राण. मात्र गेल्या काही महिन्यांपासून या परिसरात मटण तब्बल 600 रुपये किलोने विकले जात आहे. याबाबत काहीतरी पावले उचलावीत यासाठी ग्रामस्थांनी ग्रामपंचायतीकडे विनंती केली होती. त्यानंतर मटणाचे दर 360 ते 380 रुपये करावे अन्यथा दुकान बंद करावे अशी नोटीस विक्रेत्यांना बजावण्यात आली. याबाबत संतापलेल्या विक्रेत्यांनी हायकोर्टात धाव घेतली. विक्रेत्यांकडून अॅड. धैर्यशील सुतार यांनी कोर्टात याचिका दाखल केली. (हेही वाचा: Bakri Eid 2019 Mutton Recipes: यंदाची बकरी ईद चमचमीत करायची असेल तर नक्की ट्राय करा या लज्जतदार, मसालेदार मटणाच्या रेसिपीज)

या याचिकेवर निकाल देत, न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी आणि न्यायमूर्ती नितीन बोरकर यांच्या खंडपीठाने ग्रामपंचायती व जिल्हाधिकाऱ्यांना आदेश मागे घेण्याची नोटीस पाठवली. तसेच अधिकार नसताना दुकाने बंद ठेवण्याचा आदेश दिला याबाबत खुलासाही मागितला आहे. दरम्यान, मटणाचे दर निश्चित करण्यासाठी एक समिती स्थापन केली होती. मंगळवारी (10 डिसेंबर) झालेल्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीने मटणाला 480 रूपये किलो हा दर विक्रेत्यांनी मान्य केला आहे.