महाराष्ट्रामध्ये साडेतीन शक्तीपीठांपैकी एक समजली जाणार्या कोल्हापूरच्या (Kolhapur) करवीर निवासिनी महालक्ष्मी अंबाबाई च्या मंदिराची वेळ आज (19 मार्च) पासून बदलण्यात आली आहे. दरम्यान संध्याकाळी सहाच्या नंतर आता अंबाबाईच्या मंदिरात भाविकांना प्रवेश मिळणार नाही. दरम्यान हा निर्णय महाराष्ट्रात वाढत्या कोरोना रूग्णांच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आला आहे. राज्यात पुन्हा कोरोना रूग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना पहायला मिळाले आहे.
कोल्हापूरचं महालक्ष्मीचं मंदिर हे पूर्वी भाविकांसाठी सकाळी 7 ते रात्री 9 या वेळेमध्ये उघडण्यात येत होतं. पण आता मुंबई, पुणे शहरातून अंबाबाईच्या मंदिरात येणारी गर्दी पाहता आणि वाढता कोरोनाचा धोका लक्षात घेता संध्याकाळी 6 च्या नंतर महालक्ष्मी मंदिराची दारं भाविकांसाठी बंद राहणार आहेत. देवीच्या दर्शनाला मंगळवार, शुक्रवार आणि सुट्टीच्या दिवशी मोठी गर्दी असते. पण आता ही गर्दी नियंत्रणात ठेवली जाणार आहे. मंदिरात प्रवेश करण्यापूर्वी भाविकांच्या शरीराचे तापमान मोजले जाणार आहे. हात सॅनिटाईज केले जाणार आहेत तसेच भाविकांच्या तोंडावर मास्क असेल तरच त्यांना प्रवेश दिला जाणार आहे.
राज्यात कोरोनाचं संकट मागील वर्षभरापासून घोंघावत आहे. मध्यंतरी दिवाळीच्या दिवसांत कोरोना स्थिती नियंत्रणात आल्यानंतर पाडव्यापासून राज्यभर प्रार्थनास्थळं खुली करण्याला सरकारने हिरवा कंदील दिला होता. मात्र आता पुन्हा कोरोना झपाट्याने पसरत असल्याने पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने दर्शन वेळेत कपात केली आहे.