कोल्हापूर: कन्या शाळा सहल बस अपघात, 7 विद्यार्थीनी जखमी
Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

कोल्हापूर (Kolhapur District) जिल्ह्यातील दानेवाडी (Danewadi Village) परिसरात झालेल्या बस अपघातात 7 विद्यार्थिनी जखमी (Students Injured) झाल्या आहेत. ही बस विद्यार्थिनींना घेऊन सहलीवर निघाली होती. पन्हाळा दर्शन केल्यावर ही बस जोतीबा दर्शनासाठी निघाली होती. दरम्यान, पन्हाळा तालुका (Panhala Taluka) हद्दीतील वागवे घाट रस्त्यावर दानेवाडी उताराजवळ या बसला अपघात झाला. अपघाताचे नेमके कारण कळले नाही. मात्र, या अपघातात ही बस रस्त्यावरच पलटी झाली. अपघाताची माहिती कळताच स्थानिक ग्रामस्थांनी घटनास्थळी धाव घेत मदत आणि बचाव कार्य सुरु केले. विद्यार्थिनींच्या पालकांना अपघाताची माहिती देण्यात आली असून, बसमधील विद्यार्थींनींना सुरक्षीत ठिकाणी दाखल करण्यात आले आहे.

अपघाताची माहिती कळताच विद्यार्थीनींच्या पालकांनी घटनास्थळी धाव घेण्यास सुरुवात केली. या अपघातात कोणतीही जीवीत हानी झाली नाही. तसेच, कोणीही गंभीर जखमी नसल्याचे वृत्त आहे. मात्र, काळजीपोटी पालक घटनास्थळी दाखल होत आहेत. स्थानिक आमदार सुमनताई पाटील या देखील घटनास्थळाला भेट देण्याची शक्यता असल्याचे वृत्त टीव्ही 9 या वृत्तवाहिनीने दिले आहे. (हेही वाचा, सातारा: पसरणी घाटात शिवशाही बस अपघात, 33 जण गंभीर जखमी)

दरम्यान, या घटनेत 7 विद्यार्थीनी किरकोळ जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार केले जात आहेत. अपघाताची माहिती कळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करुन घटनेची नोंद घेण्याचे काम पोलीस करत आहेत. दरम्यान, अपघाताचे नेमके कारण अद्यापक समजू शकले नाही. तसेच, सहलीवर असलेली ही बस नेमकी कोणत्या कन्याशाळेची होती हे समजू शकले नाही.