कोल्हापूर (Kolhapur) येथून अतिशय दुर्मिळ आणि राज्यभरातील बहुदा पहिलीच असावी अशी धक्कादायक घटना पुढे येत आहे. चक्क कोल्हापूर जिल्हाधिकारी (Kolhapur Collector Office News) कार्यालयावर जप्तीचे आदेश काढण्यात आले आहेत. सन 1984 पासून सुरु असलेल्या एका खटल्यात जयसिंगपूर कोर्टाने हे आदेश दिले आहेत. कुरुंदवाड येथील जमिनीच्या वादाशी संबंधित हे प्रकरण आहे. जिल्हाधिकारी प्रशासनाने दुर्लक्ष केले आणि दप्तरदिरंगाई केल्याचा ठपका ठेवत कोर्टाने हे आदेश काढले.
कुरुंदवाड येथील वसंत संकपाळ यांची जमीन जिल्हा प्रशासनाने ताब्यात घेतली होती. ही जमीन कुरुंदवाडमधील विकास आराखड्यासाठी अधिगृहीत करण्यात आली होती. मात्र, त्यासाठी कोणत्याही प्रकारचा मोबदला आपल्याला मिळाला नाही, असा दावा वसंत संकपाळ यांनी करत न्यायालयात याचिका दाखल केली होती. साधारण 1984 पासून हा खटला सुरु होता. अखेर न्यायालयाने या खटल्यात निकाल दिला. (हेही वाचा, गायक Sonu Nigam च्या वडिलांच्या घरी लाखो रुपयांची चोरी; ड्रायव्हरला अटक, कोल्हापुरातून चोरीचा माल जप्त)
न्यायालयाने आदेश देताना म्हटले की, प्रशासनाने लक्षात येऊनही अनेकदा वारंवार केले. ज्यामुळे याचिकाकर्त्याला त्याचा मोबदला मिळू शकला नाही. दरम्यान, कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयावर जप्तीची प्रक्रिया राबविण्यासाठी वकील आणि अधिकारी दाखल झाल्याचे समजते. कोर्टाने जिल्हाधिकारी कार्यालयातील गाडी, खुर्च्या, लॅपटॉप आणि गाडी जप्त करण्याचे आदेश दिले आहेत.