Sonu Nigam (Photo Credits: Instagram)

गेल्या काही दिवसांमध्ये चित्रपटसृष्टीतील लोकांच्या घरी चोरीच्या घटना समोर आल्या आहेत. याआधी सुपरस्टार रजनीकांत यांची मुलगी ऐश्वर्याच्या घरातून लाखोंचे दागिने चोरीला गेले होते. आता बॉलीवूडचा प्रसिद्ध गायक सोनू निगमच्या (Sonu Nigam) वडिलांच्या घरी चोरी झाली आहे. गायक सोनू निगमचे वडील आगम कुमार निगम यांच्या घरात दोन दिवसांपूर्वी 72 लाखांची चोरी झाली होती. आता या चोरीच्या गुन्ह्याची उकल मुंबई पोलिसांनी केली असून, या प्रकरणी मुंबई पोलिसांनी आगम कुमार निगम यांच्या चालकाला अटक केली आहे.

या चालकाकडे चोरीचे 70 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. 22 मार्च रोजी सोनू निगमची बहीण निकिता निगमने वडिलांच्या घरातून 72 लाख रुपयांची चोरी झाल्याची तक्रार मुंबई पोलिसांत दाखल केली होती. या तक्रारीत त्यांनी त्यांच्या चालकावरच संशय व्यक्त केला होता. या ड्रायव्हरने डुप्लिकेट चावीच्या सहाय्याने फ्लॅटमध्ये घुसून बेडरूममधील डिजिटल लॉकरमधून 72 लाख रुपये चोरल्याचा संशय सोनू निगमच्या वडिलांना होता.

संशयाच्या आधारे पोलिसांनी चालकाचा शोध सुरू केला आणि दोन दिवसांच्या शोधानंतर त्याला अटक केली. ओशिवरा पोलिसांच्या पथकाने आरोपी रहमान उर्फ रमजान मुज्जावर (30) याला त्याच्या जोगेश्वरी येथील घरातून ताब्यात घेतले. पोलिसांनी केलेल्या चौकशीत आरोपीने चोरीची कबुली दिली असून, पोलिसांनी त्याच्या कोल्हापुरातील घरातून 70 लाख रुपये जप्त केले आहेत. (हेही वाचा: Aishwarya Rajinikanth: रजनीकांत यांच्या मुलीच्या घरी दागिन्यांची चोरी करणाऱ्यांना अटक)

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी ड्रायव्हरला 8-9 महिन्यांपूर्वी आगम कुमार निगम यांनी कामावर ठेवले होते. मात्र त्याच्या खराब कामगिरीमुळे त्याला काही दिवसांपूर्वी काढून टाकण्यात आले होते. याचा बदला घेण्यासाठी 22 मार्च रोजी संधी मिळताच या ड्रायव्हरने आगमकुमार निगम यांच्या घरी चोरी केली. या प्रकरणात चालकासह अन्य कोणाचा सहभाग आहे का, याचाही पोलीस तपास करत आहेत.