KMT Bus Strike: कोल्हापूरात केएमटी बस चालक आजपासून बेमुदत संपावर; 42 मार्गांवरील बससेवा ठप्प
Bus | Pixabay.com

कोल्हापूर महानगरपालिकेच्या परिवहन विभागामध्ये (Kolhapur Municipal Transport) कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. या अचानक पुकारलेल्या संपामुळे 42 मार्गावरील बससेवा विस्कळीत झाल्या आहेत. सध्या केएमटी मध्ये रोजंदारीवर असलेल्या कामगारांना कायमस्वरूपी नोकरीमध्ये घ्यावे, महागाई भत्ता (DA) वाढवून द्यावा या मागण्यासाठी कर्मचार्‍यांनी संप पुकारला आहे. यामुळे प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे.

केएमटी कर्मचार्‍यांनी असाच संप मार्च 2023 मध्ये केला होता. 7 नोव्हेंबर पर्यंत मुदत दिली होती असा कर्मचार्‍यांचा दावा केला आहे. मात्र वारंवार नोटीस देऊनही पालिकेने लक्ष न दिल्याने हा संप पुकारण्यात आला आहे. असे त्यांनी सांगितलं आहे. सरकारकडे सातव्या वेतन आयोगाच्या प्रस्तावाची फाईल न पाठवल्याने आता केएमटी कर्मचारी आक्रमक झाले आहेत. आजपासून सुरू झालेला संप हे बेमुदत असेल असेही कामगार संघटनेचे अध्यक्ष निशिकांत सरनाईक यांनी मीडीयाशी बोलताना सांगितले आहे. कोल्हापूरामध्ये आज 42 मार्गावरील बससेवा सकाळपासून ठप्प पडली आहे. यामध्ये प्रशासन आता कोणता मार्ग काढणार याकडे सार्‍यांचे लक्ष लागले आहे. Kolhapur Bus Accident: गोवा-मुंबई खाजगी बस राधानगरी रोड वर उलटली; एकाच कुटुंबातील तिघांचा मृत्यू .

दरम्यान कोल्हापूर मध्ये एकीकडे केएमटी कर्मचारी आक्रमक झालेले असताना सरकारने अद्याप जुनी पेन्शन योजना लागू करण्याचे आश्वासन देऊन आठ महिने उलटूनही निर्णय न घेतल्याने राज्य सरकारी कर्मचारी व शिक्षकांनीही पुन्हा आक्रमक पवित्रा घेतला आहे. सरकार विरोधातील रोष व्यक्त करण्यासाठी उद्या शनिवारी दुपारी १ वाजता सहकुटूंब जिल्हाधिकारी कार्यालयावर त्यांच्याकडून मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती देण्यात आली आहे.