Aryan Khan Drugs Case: एनसीबी पंच किरण गोसावी पुणे पोलिसांच्या ताब्यात, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणातीस मोठी घडामोड
Kiran Gosavi | (Photo Credit Twiiter)

आर्यन खान ड्रग्ज (Aryan Khan Drugs Case) प्रकरणात एनसीबीचा (NCB) पंच असलेल्या किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) ताब्यात घेतले आहे. पुणे पोलीस आयुक्तांनी ही माहिती दिली. मुंबई क्रूज पार्टी ड्रग्ज प्रकरणात एनसीबीने किरण गोसावी याला स्वतंत्र पंच केले होते. पुणे पोलिसांचे म्हणने आहे की, गोसावी याच्यावर आर्थिक गैरव्यवहार, नोकरीच्या अमिषाणे फसवणूक आणि इतर काही प्रकरणात त्याच्यावर दाखल असलेल्या गुन्ह्यांबाबत चौकशी करण्यासाठी त्याला ताब्यात घेण्यात आले आहे. किरण गोसावी याच्यावर पाठीमागील अनेक दिवसांपासून पुणे पोलीस लक्ष ठेऊन होते. मात्र, तो पोलिसांना गुंगारा देत होता. 2018 मध्ये दाखल असलेल्या एका गुन्ह्याबाबत पुणे पोलीस किरण गोसावी याच्या मागावर होते. या प्रकरणात पोलिसांनी त्याला लुकआऊट नोटीसही काढली होती. गोसावी याने असाही दावा केला होता की महाराष्ट्रात त्याच्या जीवाला धोका आहे.

किरण गोसावी याला 2018 मधील एका फसवणूक प्रकरणात पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. या प्रकरणात तो फरार होता. पुणे शहर पोलिसांनी 2019 मध्ये त्याला फरार घोषीत केले होते. तेव्हापासून तो गायब होता. त्यानंतर त्याला केवळ एनसीबीचा पंच म्हणूनच पाहायला मिळाला होता. त्यानंतर 14 ऑक्टोबरपासून पुणे पोलिसांनी त्याच्या विरोधात लूक आऊट नोटीस काढली होती. (हेही वाचा, Aryan Khan Drugs Case: समीर वानखेडे यांची ACP दर्जाच्या अधिकाऱ्याद्वारे चौकशी)

ट्विट

किरण गोसावी याच्यावर पुणे येथील फरासखाना पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. किरण गोसावी हा उत्तर प्रदेशमध्ये असल्याची माहिती मिळताच पुणे पोलिसांचे एक पथक लखनऊ येथेही पोहोचले होते. दरम्यान, पुणे पोलिसांना किरण गोसावी याला ताब्यात घेण्यात यश मिळाले आहे.

ट्विट

दरम्यान, आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात किरण गोसावी लखनऊ येथे शरण येणार अशी चर्चा होती. किरण गोसावी याचा अंगरक्षक प्रभाकर साईल याने आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात गौप्यस्फोट केला आहे. साईल याने म्हटले आहे की, किरण गोसावी याने आर्यन खान प्रकरणात शाहरुख खान याला 25 लाख रुपयांची खंडणी मागितली होती. साईल याचा आरोप आणि किरण गोसावी याचे गायब होणे यावरुन अनेक तर्कवितर्क लढविण्यात येत होते. अखेर किरण गोसावी याला पोलिसांनी ताब्यात घेतले.