महाराष्ट्राच्या कुलदैवतांपैकी एक खंडोबा मंदिराचा (Khandoba Mandir) गाभारा भाविकांसाठी दीड महिना बंद ठेवला जाणार आहे. सोमवार 28 ऑगस्ट पासून 5 ऑक्टोबर पर्यंत खंडोबाचा देवारा भाविकांसाठी बंद राहणार आहे. दुरूस्तीच्या कामासाठी हा गाभारा बंद राहणार आहे. पण भाविकांना कुलधर्म कुलाचार करण्यास कोणतीही अडचण येणार नाही अशा पद्धतीने नियोजन करण्यात येणार आहे.
देवस्थानाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, खंडोबा गडाच्या गाभाऱ्याचे दुरुस्तीचे काम होणार असल्याने भाविकांना गडावर येऊन आपले कुलधर्म कुलाचार करण्यात कोणतीही अडचण येणार नाही. खंडोबाची त्रिकाळ पूजा नेहमीप्रमाणे सुरु राहणार आहे. मात्र इतर कोणालाही गाभाऱ्यामध्ये दर्शनासाठी जाता येणार नाही.
जेजूरी गडावर ऐतिहासिक खंडोबा गड जतन करण्यासाठी महाराष्ट्र सरकारतर्फे विकास आराखड्याची कामे सुरु आहे. पुरातत्व खात्याच्या मार्गदर्शनाखाली आता मंदिराची दुरूस्ती केली जाणार आहे. त्यासाठी 107 कोटी रूपये खर्च केले जाणार आहेत. विविध विकासकामं हाती घेतली जाणार आहेत. नक्की वाचा: Jejuri Khandoba: जेजुरी खंडोबा चरणी अर्पण अडीच किलो चांदीचा रत्नजडित हार .
देवळातील मुख्य गाभाऱ्याचे काम सुरु असताना गडावर येणाऱ्या भाविकांच्या अभिषेक महापूजा या पंचलिंग भुलेश्वर मंदिरात करता येणार आहेत. आतील गाभाऱ्याचे काम पूर्ण झाल्यावर पंचलिंग मंदिराचे काम करताना भाविकांची गैरसोय टाळण्यासाठी मुख्य मंदिरात पूजा करु द्याव्यात, अशी मागणी विकास कामांच्या नियोजनासंदर्भातील बैठकीत करण्यात आली होती.