अभिनेत्री केतकी चितळेच्या (Ketaki Chitle) अडचणींमध्ये अधिकच वाढ होत आहे. शरद पवारांबद्दल (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबूक पोस्टमुळे गोत्यात आलेल्या केतकीमागील कायदेशीर कारवाईंचा ससेमिरा संपलेला नाही. केतकीवर आता अॅट्रोसिटी (Atrocity)
प्रकरणामध्ये झालेल्या सुनावणीत न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. आज न्यायलयात झालेल्या सुनावणी मध्ये तिच्या न्यायालयीन कोठडीमध्ये 7 जून पर्यंत वाढ करण्यात आली आहे. 2020 मध्ये बौद्ध धर्माविषयी सोशल मीडीयावर आक्षेपार्ह विधान केल्याप्रकरणी केतकी विरूद्ध रबाळे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
केतकीने 1 मार्च 2020 दिवशी फेसबूक पोस्ट शेअर करत काही धर्मांचा उल्लेख केला होता. नवबौद्धांबद्दल मांडलेल्या तिच्या विचारांमुळेच आता तिच्याविरूद्ध अॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी 20 मे दिवशी केतकीला 5 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. या पोलिस कोठडीनंतर आता तिला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.
'नवबौद्ध, ६ डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात, तो धर्म विकासासाठीचा हक्क', आम्ही फक्त हिंदू,असा शब्द उद्गारला, तर घोर पापी, कट्टरवादी!? पण अर्थात चूक कुणा दुसऱ्यांची नाही, तर आमचीच आहे. आम्ही स्वतःच्यातच भांडण्यात इतके बिझी आहोत, आम्हाला आमच्यातच फूट पाडणारे नेते आवडतात आणि आम्ही त्यांना ती फूट पाडू देतो, की स्वतःचा धर्म आम्ही विसरतो.' अशी पोस्ट केतकीने केली होती. यावरून तिला आता कायदेशीर कारवाईला सामोरं जावं लागत आहे.
केतकीचा लॅपटॉप आणि काही अन्य गोष्टी ठाणे गुन्हे शाखेच्या युनिट 1 कडून ताब्यात घेण्यात आले आहेत. केतकीचा मोबाईल देखील पोलिसांकडे आहे. तिच्या वस्तूंची सायबर सेलकडून तपासणी करण्यात आली आहे.