मुंबई मध्ये केईएम (KEM Hospital) या मुंबई महानगर पालिकेच्या रूग्णालयामध्ये हॉस्पिटलच्या निष्काळजीपणामुळे हात गमवाव्या लागलेल्या 3 महिन्यांच्या प्रिन्सला आता 10 लाख रूपयांची नुकसान भरपाई देण्याचा निर्णय पालिकेच्या गटनेत्याच्या बैठकीमध्ये करण्यात आला आहे. 10 लाखातील 5 लाख रूपये प्रिन्सच्या नावावर मुदत ठेवीवर तर उर्वरित पाच लाख रूपये पालकांना दिले जाणार आहेत. प्रिन्स सोबत झालेल्या या दुर्दैवी प्रकारानंतर अनेकांनी याप्रकरणी आवाज उठवला होता. (हेही वाचा: केईएम रुग्णालयात उपचारासाठी आलेल्या बालकाला शॉर्टसर्किटचा धक्का लागल्याने कापला हात)
7 नोव्हेंबरला ईसीजी मशीनमध्ये शॉर्ट सर्किट झाले. त्यानंतर गादी जळून झालेल्या अपघातामध्ये प्रिन्सचा हात भाजला. त्यानंतर तो कापावा लागला. या अपघातामध्ये प्रिन्सच्या हाताला, कानाला गंभीर दुखापत झाली आहे. सध्या प्रिन्स हॉस्पिटलमध्ये आयसीयू विभागात दाखल असून त्यांची स्थिती अत्याव्यस्थ आहे. दरम्यान केईएममधील या दुर्दैवी प्रकारानंतर पालिकेच्या महासभेत सर्वपक्षीयांनी मदतीची मागणी केली आहे. 2018 साली अशाप्रकारे राजेश मारू या तरूणाचा नायर रूग्णालयात एमआरआय मशीनमध्ये खेचलं गेल्याने मृत्यू झाला होता.
महापालिकेमध्ये सहाय्यक आयुक्त असलेल्या व्य्क्तीवर रुग्णालयांच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदाची जबाबदारी टाकल्याने कामाचा ताण वाढतो. परिणामी वॉर्डमधील कामावर त्याचा विपरीत परिणाम होतो. त्यामुळे आता लवकरच सीईओ ची नेमणूक केली जाण्यासाठी तसेच निवृत्त अधिष्ठाता आणि उप अधिष्ठाताची निवड करण्यासाठी आता हालचालींना वेग आला आहे.