अवघ्या राज्याचे लक्ष लागून राहिलेल्या कसबापेठ आणि चिंचवड पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी (Kasba, Chinchwad Assembly Election Result 2023) आज पार पडत आहे. सकाळी आठ वाजलेपासून मतमोजणीस सुरुवात होईल. कसबा आणि चिंचवड या दोन्ही मतदारसंघात भाजप विरुद्ध महाविकासआघाडी असा सामना रंगला. कसब्यातून भाजपचे हेमंत रासने विरुद्ध महाविकासआघाडीच्या वतीने काँग्रेसचे रविंद्र धंगेकर (Ravindra Dhangeka) असा थेट सामना रंगला. तर चिंचवड येथे भाजपच्या अश्विनी जगताप विरुद्ध महाविकासआघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे असा सामना रंगला. परंतू, राहुल कलाटे यांनी येथून अपक्ष अर्ज भरल्याने चिंचवडचा सामना तिरंगी झाला. मतमोजणीस सुरुवात झाल्यानंतर पुढच्या अवघ्या काहीच तासांमध्ये चित्र स्पष्ट होणार आहे.
आमदार मुक्ता टिळक आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या अकाली निधनामुळे अनुक्रमे कसबा आणि चिंचवड येथे पोटनिवडणूक लागली होती. रिक्त झालेल्या जागांवर आपलाच उमेदवार निवडून आणण्यासाठी भाजप आणि महाविकासआघाडी यांच्यात जोरदार सामना रंगला. प्रामुख्याने सत्ताधारी आणि विरोधक असे सर्वच जोरदार कामाला लागले होते. सत्ताधारी गटाकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मैदानात उतरले होते. शिवाय एकनाथ शिंदे गटाचे जवळपास सर्वच आमदार आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि इतर मंत्रीही प्रचारासाठी रिंगणात होते. महाविकासआघाडीकडून उद्धव ठाकरे (ऑनलाईन), अजित पवार, आदित्य ठाकरे, नाना पटोले, बाळासाहेब थोरात, सुनील केदार यांच्यासह सर्व नेते मैदानात होते. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार हे सुद्धा शेवटच्याक्षणी मैदानात उतरल्याचे पाहायला मिळाले.
ट्विट
Pune, Maharashtra | Counting of votes underway for Kasba Peth by-elections pic.twitter.com/CUp88aRSL3
— ANI (@ANI) March 2, 2023
दरम्यान, कसबा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी झालेल्या मतदानाच्या मतमोजणीसाठी अवघ्या 20 फेऱ्या पार पडणार आहेत. 20 फेऱ्यांमध्ये संपूर्ण चित्र स्पष्ट होणार आहे. तर दुसऱ्या बाजूला चिंचवडसाठी 37 फेऱ्या पार पडतील. कसब्यासाठी कसब्यात . ईव्हीएम मतमोजणीसाठी 14 टेबल तर टपाली मतपत्रिकांसाठी आणि सर्व्हिस वोटर्ससाठीच्या इटीपीबीएससाठी (इलेक्ट्रॉनिकली ट्रान्समिटेड पोस्टल बॅलेट सिस्टीम) प्रत्येकी एक टेबल दजेण्यात आला आहे. प्रत्येक टेबलवर एकूण 50 अधिकारी कार्यरत असतील. ज्यात मतमोजणी पर्यवेक्षक, एक मतमोजणी सहायक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांचा समावेश आहे. चिंचवडसाठीही एकूण 14 टेबल आणि टपाली मतांसाठी एक असे एकूण 15 टेबल असतील. ज्यावर 18 पर्यवेक्षक, 18 सहायक आणि 18 सूक्ष्म निरीक्षकांची मतमोजणी कार्य पार पडातील. निकालाबाबत सर्वांनाच उत्सुकता आहे.