Kasba Assembly Bypoll Results 2023: कसबा विधानसभा पोटनिवडणूक मतमोजणीत काँग्रेस उमेदवार रविंद्र धंगेरकर (Ravindra Dhangekar) यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. तर भाजपचा बालेकिल्ला मानल्या जाणाऱ्या या मतदारसंघात हेमंत रासने हे दुसऱ्या क्रमांकावर आहेत. धंगेकर आणि रासने या दोन आघाडीच्या उमेदवारांसोबतच सर्वाधिक चर्चा झाली ती बिग बॉस फेम अभिजित बिचुकले (Abhijit Bichukale) आणि हिंदू महासभेचे आनंद दवे (Anand Dave) यांच्या उमेदवारीची. या दोन्ही उमेदवारांची अनामत रक्कम जप्त होईल हे आगोदर बोलले जात होते. त्यावर आजच्या मतमोजणीत शिक्कामोर्तब होताना दिसत आहे.
मतमोजणीच्या पाचव्या फेरी अखेर आनंद दवे यांना एकूण 12 तर अभिजित बिचुकले यांना केवळ 4 मते मिळाल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे आनंद दवे यांनी अभिजित बिचुकले यांच्याव 8 मतांनी आघाडी घेतली आहे. मतमोजणी अद्यापही सुरुच आहे. त्यामुळे मतांचा आकडा काही प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. (हेही वाचा, Kasba, Chinchwad Assembly Bypoll Results 2023: भाजपच्या बालेकिल्ल्यात काँग्रेस आघाडीवर, कसबा मतदारसंघात हेमंत रासने पिछाडीवर, चिंचवड येथे काय घडतंय? घ्या जाणून)
दरम्यान, राजकीय विश्लेषक प्रामुख्याने रविंद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्याबाबतीत काय होते यावरच भर देताना दिसत आहेत. परंतू, अभिजित बिचुकले आणि आनंद दवे यांचे चाहते मात्र या दोघांना किती मते मिळाली याबाबत जाणून घेण्यास उत्सुक आहेत.
अभिजित बिचुकले उमेदवारी अर्ज दाखल केल्यापासूनच चर्चेचा विषय ठरले होते. प्रसारमाध्यमांनीही त्यांना प्रचंड महत्त्व दिले होते. कसबा हा अभिजित बिचुकले यांचा मतदारसंघ नाही. तरीही त्यांनी त्यांच्या खास शैलिनुसार उमेदवारी अर्ज दाखल केला. बिग बॉस फेम असल्याने प्रसारमाध्यमांनाही त्यांना जणू काही प्रमुख उमेदवार असल्याप्रमाणेच महत्त्व दिले.