करुणा धनंजय मुंडे (संग्रहित संपादित प्रतिमा)

काही आठवड्यांपूर्वी करुणा धनंजय मुंडे (Karuna Dhananjay Munde) यांनी केलेल्या खळबळजनक आरोपांमुळे मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) चांगलेच अडचणीत आले होते. त्यांनतर त्यांनी या आरोपांबाबत स्पष्टीकरण दिल्यावर हे प्रकरण मिटले होते. आता करुणा धनंजय मुंडे यांनी आपल्या प्रेमकथेवरील पुस्तकाची घोषणा केली आहे. ‘एक आश्चर्यजनक प्रेमकथा’ असे म्हणत त्यांनी ही बाब सोशल मिडियाच्या माध्यमातून शेअर केली आहे. मात्र प्रदर्शनापूर्वीच हे पुस्तक वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. या पुस्तकाराच्या डिझाईनवर ख्रिश्चन धर्मियांचा पवित्र ग्रंथ ‘बायबल’चा फोटो वापरून त्यावर ‘प्रेम’ असे शब्द लिहिले आहेत. याबाबत अल्फा ओमेगा ख्रिश्चन महासंघाचे प्रदेशाध्यक्ष आशिष शिंदे यांनी यासंदर्भात मुख्यमंत्र्यांना पत्र लिहले आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते आणि महाराष्ट्रातील सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणीत पुन्हा एकदा वाढ होताना दिसत आहे. धनंजय मुंडे यांची माजी प्रेयसी करुण मुंडे या धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या नातेसंबंधांबाबत एक पुस्तक लिहिण्याची तयारी करत आहेत. सोशल मीडियावर ही माहिती देताना करुणा म्हणाल्या की, धनंजय मुंडे यांच्याशी असलेल्या त्यांच्या वैयक्तिक नात्याशी संबंधित सर्व माहिती त्या आपल्या पुस्तकात देणार आहेत. मात्र त्यांनी या पुस्तकाबाबत जाहिरात करताना त्यावर बायबलचा फोटो वापरला व त्यावर प्रेम अशी अक्षरे नमूद केली. यामुळे ख्रिस्ती धर्मीयांमध्ये संतापाची लाट उसळली आहे.

(हेही वाचा: धनंजय मुंडेंविरोधात दुसऱ्या पत्नीची पोलिस आयुक्तांकडे तक्रार; मुलांना तीन महिन्यांपासून लपवल्याचा आरोप)

याबाबत ख्रिश्चन धर्मियांच्या भावना दुखावल्याची तक्रार महाराष्ट्र अल्पसंख्यांक ख्रिस्ती विकास परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल भोसले यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, अल्पसंख्यांक मंत्री यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. हा वाद वाढत असताना आता करुणा मुंडे यांनी एक व्हिडीओ पोस्ट करत घडलेल्या चुकीबाबत माफी मागितली आहे. आपल्या कार्यकर्त्यांनी चुकून बायबलचा फोटो वापरला असल्याचे त्यांनी सांगत, यामुळे आपल्या भावना दुखावल्या असतेल तर त्याबद्दल क्षमा असावी, असे त्या म्हणाल्या आहेत. त्यानंतर त्यांनी पुस्तकाबाबतचा  फोटो बदलून त्या जागी नवीन फोटो प्रसिद्ध केला आहे.