Lok Sabha Election 2024: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यात भलेही एकवाक्यता असल्याचे सांगितले जात असेल. पण, भारतीय जनतपा पक्षाच्या स्थानिक नेत्यांकडून मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांचे सुपुत्र श्रीकांत शिंदे यांच्या 'ठाणे'दारीलाच सुरुंग लावण्याचे प्रयत्न सुरु होते. त्यातूनच ठाण्यातील भाजप नेत्यांनी कल्याण-डोंबिवली लोकसभा मतदारसंघावर (Kalyan Lok Sabha Constituency) दावा सांगितला होता. आगामी लोकसभा निवडणुकीत कल्याण लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार असेल असे दावे सुरु होते. त्यावरुन नाराजीनाट्या रंगले होते. त्यामुळे शिंदे गटाची शिवसेना आणि भाजप यांच्यात जागावाटपावेळी काय घडते, याबाबत उत्सुकता होती. दरम्यान, इंडियन एक्सप्रेसला दिलेल्या मुलाखतीत देवेंद्र फडणवीस यांनी पडदा उठवत संभ्रम दूर केला आहे.
लोकसभा निवडणूक 2024 मध्ये कल्याण डोंबिवली लोकसभा मतदासंघ एकनाथ शिंदे यांच्याकडेच असेल आणि शिवसेना (शिंदे गट) ती जागा लढवेल, असे फडणवीस यांनी म्हटले आहे. आता देवेंद्र फडणवीस यांनीच जाहीर केल्यामुळे या जागेवरुन निर्माण झालेला संभ्रम आता दूर झाला आहे. त्यामुळे तुर्तास तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या सुपुत्रांची 'कल्याण'ची 'ठाणे'दारी सुरक्षीत आहे. शिवाय शिंदे यांचे उमेदवार शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हावरच लढतील. भाजपच्या चिन्हावर नाही, असेही फडणवीसांनी स्पष्ट केले. फडणीस यांच्या स्पष्टीकरणामुळे युतीमध्ये सुरु असलेली धुसफूस काही प्रमाणावर कमी होण्यास मदत होईल असे दिसते. (हेही वाचा, Maharashtra CM Face for 2024: 'आमची भूमिका लवचिक, कधी तुम्ही कधी आम्ही', देवेंद्र फडणवीस यांच्या वक्तव्यावर शिंदे गट)
शिवसेना भाजप युतीमध्ये ठाण्यात सरुवातीपासूनच तणाव होता. त्यामुळे काही झाले तरी एकनाथ शिंदे आणि त्यांच्या शिवसेना पक्षाला आगामी निवडणुकीत मदत करायची नाही असा ठरवाच ठाणे भाजपने केला होता. या ठरवास देवेंद्र फडणीस यांचे विश्वासू म्हणून ओळखले जाणारे आमदार रविंद्र चव्हाण यांचेही सूचक अनुमोदन होते. त्यामुळे भाजपचे वरीष्ठ नेते आणि फडणवीस ठाणे आणि कल्याणच्या जागेबद्दल काय भूमिका घेतात याबाबत उत्सुकता होती. मात्र, फडणवीसांनी सध्या तरी आपले वजन शिंदे यांच्या पारड्यात टाकले आहे. भविष्यात देवेंद्र फडणवीस याच निर्णयावर ठाम राहतात का की तत्कालीन राजकीय परिस्थिती विचारात घेऊन भूमिकेत बदल करतात याबाबत उत्सुकता आहे.