Coronavirus Representational Image (Photo Credits: PTI)

कोरोना व्हायरसच्या संकटकाळात नागरिकांना लाखो रुपयांची बिल हातात टेकवून खासगी रुग्णालये लूटमार करत असल्याच्या तक्रारी नागरिकांकडून समोर आल्या आहेत. याच कारणास्तव कल्याण-डोंबिवली महापालिकेकडून या खासगी रुग्णालयाच्या कारभाराच्या विरोधात कारवाई करण्यासाठी एक विशेष टीमची नेमणूक करण्यात आली आहे. त्यानुसार महापालिकेने तीन रुग्णालयांच्या विरोधात कारवाई केली असून त्यांच्याकडून तब्बल 3.3 लाख रुपयांचा दंडाची वसूली केली आहे. तसेच या प्रकरणी अतिरिक्त बिल देणाऱ्या एका कोविड19 च्या रुग्णाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची बाब ही समोर आली आहे.

कल्याण-डोंबिवलीत कोविड19 च्या रुग्णांचा आकडा 17 हजारांच्या पार गेला आहे. त्यामुळे या ठिकाणी असलेल्या 24 खासगी रुग्णालयांना सरकारने कोरोनाबाधित रुग्णांवर करण्यात येणाऱ्या उपचारासांठी काही रक्कम ठरवून दिली आहे. त्यानुसार रुग्णांकडून उपचाराचे पैसे घ्यावे असे ही खासगी रुग्णालयांना सांगण्यात आले आहे. परंतु तरीही काही रुग्णालये रुग्णांना भरमसाठ बिलाची रक्कम असलेली बिल त्यांच्या माथी मारत आहेत.(महाराष्ट्र सरकार COVID19 ची परिस्थिती पाहता 500 रुग्णवाहिका करणार खरेदी, वाहतुकीची गैरसोय असलेल्या ग्रामीण भागात नागरिकांसाठी होणार उपलब्ध)

महापालिकेकडून खासगी रुग्णालयांच्या विरोधातील कारवाईसाठी तयार करण्यात आलेल्या टीमचे प्रमुखे विनय कुलकर्णी यांनी असे म्हटले आहे की, एका रुग्णाला तब्बल 4.8 लाख रुपयांचे बिल देण्यात आले. परंतु रुग्णाचा मृत्यू उपचारादरम्यान झाल्याचे त्याच्या नातेवाईकांनी सांगितले. यावर टीमने अधिक तपास केला असता रुग्णाला अतिरिक्त 3.36 लाख रुपयांचे बिल देण्यात आल्याचे समोर आले. परंतु रुग्णांच्या नातेवाईकांनी बिलाची रक्कम पूर्ण भरली. मात्र महापालिकेच्या टीमने केलेल्या कारवाईनंतर त्यांना अतिरिक्त बिलाची रक्कम परत देण्यात आली आहे. अशाच प्रकारच्या तक्रारी दोन रुग्णांलयांच्या विरोधात आल्या असून त्यांना नोटीस धाडण्यात आल्यातचे ही सांगण्यात आले आहे. कल्याण-डोंबिवली महापालिकेने या सर्व प्रकारामुळे त्यांचा एक कर्मचारी शहरातील 24 खासगी रुग्णालयात कार्यरत ठेवणार असल्याचा निर्णय घेतला आहे.