Mumbai local train | Representational Image | (Photo Credits: PTI)

ठाकुर्ली रेल्वेस्थानकातील पादचारी पुलाच्या गर्डर उभारणीसाठी कल्याण-डोंबिवली (Kalyan-Dombivali) रेल्वे सेवा आज सकाळी 9.45 ते 1.45 पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. या दरम्यान या रेल्वे स्थानकांदरम्यान सर्व लोकल तसेच मेल एक्सप्रेस चार तास बंद राहणार आहेत. ऐन सुट्टीच्या दिवशी विशेष ख्रिसमसच्या दिवशी या मेगाब्लॉक मुळे प्रवाशांना नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. तसेच या भागात वाहतुकीची पर्यायी व्यवस्था नसल्याने प्रवाशांना रस्ते मार्गाचा पर्या स्विकारावा लागणार आहे. नाताळच्या सुट्टीची दिवशी नेमका हा घोळ झाल्याने सण साजरा करण्यासाठी किंवा सुट्टी एन्जॉय करण्यासाठी घराबाहेर निघालेल्या लोकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागणार आहे.

मुंबई सीएसएमटी ते कल्याण दरम्यान ठाकुर्ली स्थानकात बुधवारी पादचारी पुलांचे गर्डर चढवण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. यावेळी 400 मेट्रिक टन वजनाचे चार गर्डर चढवले जाणार आहेत. परंतु या संदर्भातील नियोजन ऐनवेळी करून सणाच्या दिवशी रेल्वे प्रशासनाने हा ब्लॉक घेतल्याने प्रवाशांमध्ये नाराजी आहे. या काळात प्रवाशांना कल्याण किंवा डोंबिवली रेल्वे स्थानकात अडकून पडावे लागणार आहे.

हेदेखील वाचा- Mumbai: ख्रिसमसच्या दिवशी मध्य रेल्वेचा Jumbo Block, अनेक गाड्या रद्द; जाणून घ्या कसे असेल वेळापत्रक

कसा कराल पर्यायी प्रवास?

मध्य रेल्वेच्या लांब पल्ल्याच्या गाड्या दिवा-पनवेल-कर्जत मार्गे वळवण्यात आल्या आहेत. या गाड्यांमधून प्रवास करण्यासाठी प्रवासांना दिवा रेल्वे स्थानकात थांबा देण्यात आला आहे. परंतु कल्याणवरून डोंबिवलीत येणे बंद झाल्यामुळे या गाड्या पकडण्यासाठी दिवा स्थानकात पोहचणार कसे, असा प्रवाशांचा सवाल आहे. या गाड्यांमधून दिव्यात उतरल्यास केवळ डोंबिवलीपर्यंत पोहोचण्याची सेवा उपलब्ध असल्याने डोंबिवलीत अडकून पडण्याची वेळ प्रवाशांवर येणार आहे.

या ब्लॉकमुळे रेल्वेकडून काही लांब पल्ल्याच्या गाड्याही रद्द करण्यात आल्या आहेत. या गाड्यांमध्ये, सीएसएमटी-पुणे सिंहगड, सीएसएमटी-पुणे डेक्कन क्वीन, सीएसएमटी-मनमाड पंचवटी, सीएसएमटी-मनमाड राज्यराणी, दादर-जालना जनशताब्दी, सीएसएमटी-कोल्हापूर महालक्ष्मी, सीएसएमटी-भुसावळ पॅसेंजर या गाड्यांचा समावेश होतो.