Kala Ghoda Arts Festival (संग्रहित संपादित प्रतिमा)

मुंबईकरांसाठी, विशेषत: शहरातील कलाप्रेमींसाठी आनंदाची बातमी आहे. शहरातील अनेक लोक लोकप्रिय काळा घोडा आर्ट्स असोसिएशनद्वारे आयोजित काळा घोडा कला महोत्सवाची (KGAF) वाट पाहत आहेत आणि आता लवकरच त्यांची ही प्रतीक्षा संपणार आहे. काळा घोडा कला महोत्सव 20 ते 28 जानेवारी, 2024 या कालावधीत होणार आहे. हा उत्सव कला, हस्तकला आणि सर्जनशीलतेचा उत्साही उत्सव आहे, जो विविध कलात्मक अभिव्यक्ती आणि सांस्कृतिक वारसा दर्शवतो.

लोकांमध्ये कला जागरुकता पसरवण्याच्या उद्देशाने दक्षिण मुंबईत काळा घोडा कला महोत्सावाची सुरुवात झाली. गेल्या काही वर्षांत या फेस्टिव्हलची लोकप्रियता इतकी वाढली आहे की, मुंबईसह इतर ठिकाणचे लोकही यासाठी येतात.

या महोत्सवामध्ये कॉमेडी, नृत्य, चित्रपट, खाद्य, साहित्य, संगीत, नाट्य, शहरी रचना, वास्तुकला आणि व्हिज्युअल आर्ट्स यासह असंख्य कलात्मक विषयांचे प्रदर्शन आणि कार्यशाळा आयोजित केल्या जातात. यंदाच्या महोत्सवातही नामवंत आणि नवीन कलाकार सहभागी होण्याची अपेक्षा आहे. या कलाकारांना त्यांची सर्जनशीलता दाखवण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल.

या महोत्सवामध्ये संगीत प्रेमींना त्यांचे आवडते भारतीय कलाकार- हरिप्रसाद चौरसिया, अमजद अली खान, सोनू निगम, फरहान अख्तर सारख्या कलाकारांचे आवाज ऐकायला मिळतील. तर लोकप्रिय नृत्यांगना मल्लिका साराभाई, अदिती मंगलदास, तसेच थिएटरमधील दिग्गज नादिरा बब्बर त्यांची कला सादर करतील. (हेही वाचा: Mumbai Metro Line 3 Phase 1: मुंबईकरांना दिलासा! मेट्रो मार्ग 3 चा पहिला टप्पा या वर्षअखेरीस कार्यान्वित होण्याची शक्यता)

काळा घोडा असोसिएशन या महोत्सवातील निधीचा वापर मुलजी जेठा फाउंटन, केई सिनेगॉग, होर्मर्जी क्लॉक टॉवरसह परिसरातील हेरिटेज इमारती आणि स्मारके पुनर्संचयित करण्यासाठी आणि जतन करण्यासाठी करते. अशाप्रकारे तुम्हीदेखील पुढील वरही भारतातील सर्वात प्रतिष्ठित कला महोत्सवाला भेट देऊन, कलेच्या सामर्थ्याच्या उत्सवाचा आनंद घेऊ शकता.