Blinc Technologies | (Photo Credits: linkedin)

जेट एअरवेज (Jet Airways) कंपनीचे संस्थापक नरेश गोयल यांचे पूत्र निवान गोयल यांनी एका नव्या कंपनीची स्थापना केली आहे. ही कंपनी ट्रॅवल टेक्नॉलजी (Travel Technology Company)क्षेत्रा काम करणार आहे. निवान यांचा चुलतभाऊ आणि जेट एअरवेज कंपनीचे माजी एग्जिग्यूटिव निखिल राघवन हे सुद्धा या कंपनीत निवान यांचे सहकारी आहेत. निवान यांच्या नव्या कंपनीचे नाव Digital Blinc Technologies असे आहे. कंपनीची नोंदणी करण्यासाठी जी कागदपत्रं सादर करण्यात आली आहेत. त्या कागदपत्रांवरुन हे नाव पुढे आल्याचे प्रसारमाध्यमांनी म्हटले आहे. तसेच, 10 लाख रुपयांच्या प्राथमीक भागभांडवलावर ही कंपनी महाराष्ट्रात जून महिन्यातच स्थापन करण्यात आल्याचे वृत्त आहे. दरम्यान, देशात आर्थिक मंदी सुरु असताना ही कंपनी तरुणांना नोकरी देऊ शकेल असा विचारही काहींनी बोलून दाखवला आहे.

कागदपत्रांच्या हवाल्याने प्रसारमाध्यांनी दिलेल्या वृत्तानुसार, गोयल आणि राघवन हे या कंपनीचे संचालक आहेत. दरम्यान, राघवन यांनी ऑगस्ट महिन्यात फेसबूक पोस्टच्या माध्यमातून आपण अशा प्रकारची कंपनी स्थापन करत असल्याची माहिती दिली होती. राघवन यांनी आपल्या पोस्टमध्ये लिहिले होते की, सांगण्यास अत्यंत आनंद होतो आहे की, मी ‘Blinc Technologies’ नावाच्या एका टेक स्टार्टअपचा मी सह-संस्थापक आहे. हा व्यवसाय बिजनेस टू कस्टमर असा आहे.

दरम्यान, कंपनीच्या संकेतस्थळावर दिलेल्या माहितीनुसार, ग्राहकांना ऑनलाईन टिकटिंग सॉल्युशन, कॅब राईड शेअरींग अॅप्लीकेशन आणि डिजिटल पेमेंट यासारख्या सेवा ही कंपनी देईल. दरम्यान, उल्लेखनीय असे की, भारताची सर्वात जुनी एअरलाईन्स कंपनी जेट एअरवेज कंपनीने आपल्या सर्व विमानांचे उड्डाण 17 एप्रिल 2019 पासून बंद केले होते. कर्ज आणि देणी भागवता न आल्याने कंपनीचे दिवाळे वाजल्याचे चित्र आहे. नरेश गोयल यांनी 26 वर्षांपूर्वी जेट एअरवेजची स्थापना केली होती. 2007 मध्ये जेट एअरवेज मध्ये 13,000 कर्मचारी होते. मात्र, 2008 मध्ये कर्मचारी कपात करत तब्बल 2000 लोकांना कामावरुन काढून टाकण्यात आले होते. 2012 पासून जेट एअरवेज आर्थिक गर्तेत जायला सुरुवात झाली. पुढे ही कंपनी अधिकच गाळात जाऊन बंद पडण्याच्या मार्गावर आली. (हेही वाचा, Jet Airways च्या 500 कर्मचाऱ्यांना SpiceJet ने दिली नोकरी; 27 नवीन विमाने घेऊन मार्ग वाढवण्याचा मानस)

दरम्यान, निवान गोयल यांची Digital Blinc Technologies आणि जेट एअरवेज यांचा थेट संबंध नाही. मात्र, एकेकाळी जेट एअरवेजचे संस्थापक राहिलेल्या आणि नरेश गोयल यांच्या मुलाने तिच जेट एअरवेज दिवाळखोरीत असताना एक नवी कंपनी स्थापन करवी, याबाबत आश्चर्य व्यक्त केले जात आहे.