Jaysingrao Gaikwad Quit BJP: भाजपला हादरा, आणखी एक केंद्रीय माजी मंत्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या गळाला, शरद पवार यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश
Jaysingrao Gaikwad Joined NCP | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

Jaysingrao Gaikwad Joined NCP: शरद पवार यांचे राजकारण आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष संपला असे सांगणाऱ्या भाजपला आणखी एक धक्का बसला आहे. ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांच्यानंतर बीड जिल्ह्यातील भाजपचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री जयसिंगराव गायकवाड (Jaysingh Gaikwad) यांनी भाजपला सोडचिठ्ठी (Jaysingrao Gaikwad Quit BJP) देत राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) पक्षात प्रवेश केला आहे. शरद पवार यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश पार पडला. या पक्ष प्रवेशाच्या माध्यमातून शरद पवार (Sharad Pawar) यांनी पुन्हा एकदा भाजपला हादरा दिला आहे. बीड हा भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा बालेकिल्ला मानला जातो. या किल्ल्यातच भाजपला आव्हान मिळाले आहे.

जयसिंगराव गायकवाड यांनी पक्ष संघटनेतील सर्व पदांचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली होती. त्यावेळी त्यांनी कोणत्या पक्षात जाणार हे स्पष्ट केले नव्हते. परंतू, अल्पावधीतच त्यांनी आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षत जाणार असे स्पष्ट केले आणि लगोलग पक्षात प्रवेशही केला. पदवीधर मतदारसंघ निवडणुकीची धामधूम सुरु आहे. अशात महाविकासआगाडी विरुद्ध भाजप असा सामना रंगला आहे. या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांमध्ये महत्त्वाच्या नेत्यांचे स्थान वाढले आहे. कारण या निवडणूकांच्या मतदारसंघांची व्याप्ती मोठी असते. अशात गायकवाड यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने भाजपला जोरदार धक्का बसल्याचे मानले जात आहे. (हेही वाचा, Jaysingrao Gaikwad Quits BJP: एकनथ खडसे, जयसिंगराव गायकवाड यांच्या राजीनाम्याने मराठवाड्यात भाजपची कोंडी? राजकीय समिकरणे बदलण्याची शक्यता)

कोण आहेत जयसिंगराव गायकवाड?

जयसिंगराव गायकवाड हे भाजपचे जुने आणि ज्येष्ठ नेते आहेत. त्यांनी दिवंगत प्रमोद महाजन, गोपिनाथ मुंडे यांच्यासोबत काम केले आहे. पक्ष संघटना वाढविण्यात गायकवाड यांचा मोठा वाटा आहे. बीड लोकसभा मतदारसंघातून जयसींगराव गायकवाड हे तीन वेळा भाजप तिकीटावर निवडूण गेले आहेत. तसेच, पदवीधर मतदारसंघातून दोन वेळा ते विधानपरिषदेवर आमदार राहिले आहेत. दरम्यान, पदवीधर मतदारसंघ निवडणुकीत बंडाचे निशाण फडकवत त्यांनी आपल्या सदस्यत्वाचा राजीनामा देत भाजपला सोडचिठ्ठी दिली आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश करताच जयसींग गायकवाड यांनी भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. भाजप हा आता मूळ पक्ष राहिला नाही. या पक्षाची विचारसरणी बदलली आहे. हा पक्ष आता खुंखार मानसांच्या ताब्यात गेला आहे. इथे ज्येष्ठांना मानसन्मान दिला जात नाही. तसेच, चांगल्या कार्यकर्त्यांचा या पक्षात वाळवंट केला जातो. तीच अवस्था नेत्यांचीही होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची अवस्था पक्षाने काय केली आहे हे सर्वांना माहिती आहे. अशी टीका गायकवाड यांनी या वेळी केली.

जयसिंगराव गायकवाड यांनी कोणाचाही नामोल्लेख न करता भाजपवर तीव्र शब्दात टीका केली. ते पुढे म्हणाले, भाजपमध्ये निष्ठावान कार्यकर्त्यांचा मोठ्या प्रमाणावर कोंडमारा केला जातो. आम्ही पक्ष वाढीसाठी प्रयत्न केले. आंदोलने केली, लोकांची बोलणी पोलीसांच्या लाठ्या खाल्ल्या. यावेळी आता भाजपमध्ये नेतृत्व करत असलेला एकही नेता नव्हता. हे नेतेच नव्हे तर यांचे बापही त्या वेळी पक्षासोबत पक्षात नव्हते, असे गायकवाड म्हणाले.