जळगाव (Jalgaon) जिल्ह्यात 2 वर्षांपूर्वी घडलेल्या घटनेचा धक्कादायक निकाल न्यायालयाने दिल्याने या परिसरात खळबळ उडाली आहे. 26 मार्च 2019 मध्ये जळगावच्या पाचोरा तालुक्यातील नगरदेवळा भागात एका 3 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. त्यातील आरोपीस पीडित मुलीची साक्ष ग्राह्य धरून जळगाव न्यायालयाने मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. किशोर भोई असे या आरोपीचे नाव आहे. पीडित मुलीच्या घराशेजारी राहणा-या आरोपी किशोर भोई याने दोन वर्षांपूर्वी या मुलीला चॉकलेटचे आमिष दाखवून राहत्या घरात तिच्यावर लैंगिक अत्याचार केला होता.
पीडित मुलीने घडलेला प्रकार आपल्या आईला सांगितल्यानंतर तिच्या आईने पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. त्यावरून किशोर भोई याला अटक करण्यात आली.हेदेखील वाचा- Pooja Chavan Suicide Case: पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणी अरुण राठोड पोलिसांच्या ताब्यात
घटनेचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस निरीक्षक दत्तात्रय नलावडे यांनी पुरेसे पुरावे गोळा करीत जळगांव जिल्हा न्यायालयात आरोपीच्या विरोधात दोषारोप पत्र दाखल केले होते. 29 नोव्हेंबर 19 रोजी या खटल्याच्या सुनावणीस जळगांव न्यायलायत सुनावणी सुरू झाली होती. या खटल्यात दहा साक्षीदारांसह पीडित बालिकेची साक्ष ही न्यायालयात घेण्यात आली होती. न्यायालयात पीडितेस विचारण्यात आलेल्या प्रश्नांची त्या अल्पवयीन मुलीने अगदी नीट उत्तरे दिली. या उलट आरोपीच्या वकिलांनी तिला विचारलेली प्रश्न ही तिने खोडून काढली.
पीडितेची बाजू ऐकल्यानंतर तिची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने किशोर भोई यास मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आणि अडीच हजार रुपये दंडाची शिक्षा ठोठावली आहे.
केवळ तीन वर्षांच्या मुलीची साक्ष ग्राह्य धरत न्यायालयाने आरोपीस मरेपर्यंत जन्म ठेपेची शिक्षा जाहीर केल्याच्या निर्णयाचे महिलांनी स्वागत केले आहे. या निकालामुळे अशा प्रकारचे गुन्हे करणाऱ्या आरोपींना नक्कीच धाक बसेल आणि अशा घटना कमी होण्यास मदत होणार असल्याने या निर्णयाचा स्वागत महिला वर्गाने केले आहे.