Siblings Murder In Jalgaon: कुऱ्हाडीचे घाव घालून 4 अल्पवयीन भावंडांची हत्या, रावेर तालुक्यातील बोरखेडा गावातील घटना
Siblings Murder In Jalgaon | (Image Used For Representational purpose Only | Photo Credits: Pixabay.com

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील रावेर (Raver Taluka) तालुक्यात असलेल्या बोरखेडा (Borkheda) गाव हद्दीत घडलेल्या घटनेमुले महाराष्ट्र हादरुन गेला आहे. बोरखेडा गावच्या हद्दीत असलेल्या शेतात 2 मुली आणि 2 मुले अशा 4 अल्पवयीन भावंडांचा (Siblings Murder) कुऱ्हाडीने (Ax) घाव घालून हत्या करण्यात आली आहे. ही घटना आज ( शुक्रवार, 16 ऑक्टोबर) सकाळी घडली. हत्या कोणी आणि का केली याबाबत माहिती अद्याप पुढे आली नाही. या घटनेनंतर पोलीस घटनास्थळी पोहोचले असून प्रकरणाचा तपास सुरु आहे.

राणी मेहताब भिलाला (वय ५), अनिल (वय ८), राहुल (वय ११) आणि सविता (वय १४) अशी मृत बालकांची नावे आहेत. प्राप्त माहितीनुसार, बोरखेडा रस्त्यावर मुस्तफा यांची केळीची बाग आहे. केळीबागेच्या शेतात महेताब गुलाब भिलाला हा रखवाली करतो. तो मुळचा गढी (ता. बिस्टान जि. खरगोन) येथील रहीवासी आहे. चुलतभावाच्या नातवाचा मृत्यू झाल्याने त्याच्या दशक्रिया विधीसाठी तो आपली पत्नी आणि चुलतभावासह गढी या मूळ गावी गेला होता. दरम्यान, ही चार भावंडं घरीच राहीली होती. दरम्यान, अज्ञाताने या चौघांचीही हत्या केली. पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे व अपर पोलीस अधीक्षक चंद्रकांत गवळी घटनास्थळी दाखल झाले असून, घटनेचा तपास सुरु आहे. (हेही वाचा, धक्कादायक! आजोबाने केली 7 वर्षाच्या नातवाची धारधार विळ्याने हत्या; परभणी जिल्ह्यातील घटना)

दरम्यान, राज्याचे पाणीपुरवठा मंत्री आणि जळगावमधील नेते गुलाबराव पाटील यांनी या घटनेबाबत प्रतिक्रिया दिली आहे. गुलाबराव पीटील यांनी म्हटले आहे की, ही घटना अत्यंत निंदनीय आहे. घटनेची चौकशी होऊन गुन्हेगाराला लवकरात लवकर शिक्षेपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न केले जातील. मी सध्या प्रवासात आहे. लवकरच घटनास्थळी जाऊन माहिती घेणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचाही मला फोन आला होता. या घटनेबाबत त्यांनी माझ्याकडे विचारणा केली, अशी माहितीही गुलाबराव पाटील यांनी या वेळी व्यक्त केली.