शिवसेना नेता गुलाबराव पाटील यांनी महाराष्ट्रातील जळगाव मध्ये गुरूवारी (13 फेब्रुवारी) दिवशी तरूणांना अजब सल्ला दिला आहे. दरम्यान विद्यार्थी दशेमध्ये असताना पैसे मिळवण्यासाठी शाकाहारी हॉटेल सुरू केले. नंतर नॉन व्हेज पदार्थ सुरू केले. पण जेव्हा हॉटेलमध्ये परमिट रूम सुरू केली तेव्हा दिवसभराचा गल्ला 4 हजारावरून 20 हजारांवर गेल्याचं म्हटलं आहे. 'शाकाहारी हॉटेल चालत नाही पण परमिट रूम चालते' असं विधान गुलाबराव पाटील यांनी केल्याने नव्या वादाला तोंड फुटलं आहे. प्रधानमंत्री मुद्रा योजना अंतर्गत शासकीय योजनांच्या संदर्भात जिल्हास्तरीय मेळाव्याचं उद्घाटन पाणीपुरवठा आणि जळगावचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. त्यावेळी तरुणांना मार्गदर्शन करत असताना त्यांनी हा अजब सल्ला दिला आहे.
जळगावमध्ये या कार्यक्रमात तरूणांसोबत आपले अनुभव शेअर करताना गुलाबराव पाटील यांनी दारूच्या दुकानाबाबतही समर्थन केले आहे. एका व्यक्तीने दिलेल्या सल्ल्यानुसार, दारूचं दुकान टाक व्यवसाय दुप्पट होईल. आपण राजकारणामध्ये असल्याने दारूचा व्यवसाय कसा करायचा पण आपण नाही केला तर दुसरं कोणीतरी करणार मग आपण का सुरू करणार असा विचार मनात आला. त्यानंतर 60 हजाराहून अधिक रूपयांचा गल्ला जमला. त्यामुळे व्यवसाय करायचा असेल तर आवड पाहिजे आणि तो मनापासून करता आला पाहिजे असे सांगत त्यांनी बेरोजगारांना मार्गदर्शन केले आहे. एकनाथ खडसे BJP ला रामराम ठोकणार? शिवसेना आमदार गुलाबराव पाटील यांच्या 'या' गौप्यस्फोटानंतर चर्चेला उधाण.
महाविकास आघाडीच्या सरकारमध्ये गुलाबराव पाटील हे जळगावचे पालकामंत्री तर पाणीपुरवठा मंत्री आहेत. दरम्यान त्यांनी काल मनसेवर टीका करताना औरंगाबाद शहराचे नामकरण ‘संभाजीनगर’ करण्याची मागणी पहिल्यांदा शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. आज प्रत्येक शिवसैनिक संभाजीनगर असा उल्लेख करतो. त्यामुळे आमचं उष्ट कुणी खाऊ नये, अशा शब्दांत गुलाबरावांनी मनसेला टोला लगावला आहे.