जळगाव: मुक्ताईनगर पंचायत समिती माजी सभापती डी. ओ. पाटील ह्यांची हत्या; धारधार शस्त्राने चिरला गळा
Murder | (Photo Credits: PixaBay)

जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील मुक्ताईनगर पंचायत समिती (Muktainagar Panchayat Samiti) माजी सभापती डी. ओ. पाटील ( D O Patil) यांची हत्या करण्यात आली आहे. धारधार शस्त्रांनी गळा चिरून पाटील यांची हत्या केल्याचे वृत्त आहे. कुऱ्हा येथील पाटील पेट्रोल पंप परिसरात ही घटना बुधवारी (17 जून 2020) पहाटे साडेपाच-सहाच्या सुमारास उघडकीस आली. पाटील हे मुळचे कुऱ्हा येथील रहिवासी आहेत. हत्येचे कारण अद्याप समोर आले नाही. मात्र, राजकीय अथवा पूर्ववैमनस्यातून ही हत्या घडली असावी अशी चर्चा परिसरातील नागरिकांमध्ये सुरु आहे. दरम्यान घटनेची माहिती कळताच परिसरात दोन ते तीन हजार नारिकांचा जमाव जमला. पोलिसांनी मोठ्या शथापीने जमाव नियंत्रणात आणला. परिसरात सध्या तणावपूर्ण शांतता आहे.

डी. ओ. पाटील हे मुळचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते. मात्र, विधानसभा निवडणुकीवेळी ते राष्ट्रवादी काँग्रेसमधून भारतीय जनता पक्षात आले होते. स्थानिक राजकारणातील अत्यंत मनमिळवू व्यक्तिमत्व अशी त्यांची ओळख होती. दरम्यान, पाटील यांची हत्या मंगळवारी रात्री नेमकी कधी झाली याबाबत माहिती मिळू शकली नाही. तसेच हत्येचे कारणही समजू शकले नाही. मुक्ताईनगर पोलीस सर्व बाजूंनी तपास करत आहेत. (हेही वाचा, बीड: जमीनीच्या वादातून एकाच कुटुंबातील तिघांची निघृण हत्या; 12 जण अटकेत)

प्राप्त माहितीनुसार डी. ओ. पाटील हे शेतीच्या कामासाठी अनेकादा रात्री-अपरात्री घराबाहेर पडत असत. डिझेल भरण्यासाठी पंपावर जात असत. अनेकदा तर ते पंपावरच झोपत असत. त्यांचा हा नेहमीचा मार्ग असे. त्यामुळे कोणीतरी त्यांच्यावर पाळत ठेऊन, अथवा माहितीतल्या व्यक्तिनेच ही हत्या केली असावी असा कयास बांधला जात आहे.