Jalgaon Flood: पुरामुळे जळगाव जिल्ह्यात 15,195 हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान; कोकणच्या धर्तीवर मिळणार मदत, महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय
Floods Situation | (Photo Credits: ANI)

देशातील अनेक राज्यांमध्ये पुन्हा एकदा मान्सूनने आगमन झाले आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी यावेळी जोरदार पाऊस (Heavy Rains) पडत आहे. मराठवाड्याला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. यामुळे औरंगाबाद-कन्नड-जळगाव हा व्यापारी मार्ग पूर्णपणे ठप्प झाला आहे. मुसळधार पावसामुळे जळगावात (Jalgaon Flood) मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. जिल्ह्यातील अनेक भाग, घरे आणि रस्ते पूर्णपणे पाण्याखाली गेले आहेत. जळगावच्या चाळीसगावात मुसळधार पावसामुळे पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. येथे अनेक ठिकाणी रस्ते खराब झाले आहेत. यामुळे लोकांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे.

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगावसह पाचोरा आणि भडगाव तालुक्यात अतिवृष्टीने 108 घरांची पूर्णत: तर 653 घरांची पूर्णपणे हानी झाली असून, 306 दुकाने क्षतीग्रस्त झाली आहेत. 404 लहान तर 614 मोठी गुरे वाहून गेली असून, तब्बल 15,195 हेक्टर क्षेत्रावरील पीक आणि फळ पीकांचे नुकसान झाले आहे. नुकसानीबाबत पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री  गुलाबराव पाटील यांनी मंत्रीमंडळाच्या बैठकीत सविस्तर माहिती दिली.

यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जळगाव जिल्ह्यातील तिन्ही तालुक्यांमध्ये अतिरिक्त मनुष्यबळ लावून नुकसानीचे प्रस्ताव तातडीने पाठविण्याचे जिल्हा प्रशासनाला निर्देश दिले असून, यानंतर लागलीच मदत केली जाणार असल्याची ग्वाही दिली आहे, अशी माहिती मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिली. (हेही वाचा: कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा संभाव्य धोका, पुणे महानगरपालिकेच्या खाजगी रुग्णालयांना महत्वाच्या सूचना)

या आपत्तीमुळे चाळीसगाव तालुक्यातील 42,  पाचोऱ्यातील 4 तर भडगावमधील 2 असे एकूण 38 गावे बाधित झाली आहेत. या गावांमधील नागरिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे हजारो शेतकऱ्यांवर आभाळ कोसळले आहे. यामुळे त्यांना तातडीने मदत मिळावी अशी मागणी श्री.पाटील यांनी केली. या मागणीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मान्यता दिली असून कोकणच्या धर्तीवर ही मदत आपद्ग्रस्तांना तातडीने प्रदान करण्यात येणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली आहे, अशी माहितीही मंत्री श्री.पाटील यांनी दिली.