नुकतेच महाराष्ट्राने पहिल्यांदाच एकाच दिवशी शिवसेना (Shiv Sena) पक्षाचे दोन दसरे मेळावे पाहिले. शिंदे गटाचा मेळावा बीकेसी येथे पार पडला व या मेळाव्याला उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांचे बंधू जयदेव ठाकरे (Jaidev Thackeray), वाहिनी स्मिता ठाकरे व पुतण्या निहार ठाकरे यांनी हजेरी लावली. जयदेव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्या अगदी शेजारी बसून भाषणही केले. त्यांनी जनतेला एकनाथ शिंदे यांना पाठींबा देण्याचे आवाहन केले. याबाबत अनेक प्रतिक्रिया समोर आल्या. आता उद्धव ठाकरेंच्या आतेबहिणीने याबाबत आपले मत मांडले आहे.
बाळासाहेब ठाकरेंच्या धाकट्या भगिनीच्या कन्या किर्ती पाठक यांनी जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांच्यावर टीका केली आहे. माध्यमांशी बोलताना त्या म्हणाल्या, ‘मला हे चित्र खूप दुर्दैवी वाटतंय. हे सर्व बघताना आमच्या कुटुंबातील सर्वांनाच त्रास होत आहे. ठाकरे कुटुंबातील सदस्य आपल्याला पाठींबा देत आहेत हे दाखवण्याचा शिंदे गटाचा म्हणजेच गद्दार गटाचा केविलवाणा प्रयत्न चालू आहे.’
त्या म्हणाल्या, ‘2009 मध्ये स्मिता ठाकरे यांनी कॉंग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता. त्यांनी माध्यमांना तशा प्रतिक्रिया आणि मुलाखतीही दिल्या होत्या. त्यांनी काँग्रेसच्या नेत्या सोनिया गांधी आणि नेते राहुल गांधी यांचे गोडवे गायले होते. कॉंग्रेसच देश पुढे नेऊ शकेल असे त्या म्हणाल्या होत्या. मात्र आता या गोष्टी कुठे गेल्या? शिंदे यांनी त्याबाबत काही विचारलेही नाही. बाळासाहेब हयात असताना स्मिता यांनी कॉंग्रेसचे कौतुक केले होते, अशा व्यक्तीचा स्टेजवर बोलावून सन्मान केला जात आहे. हा दुटप्पीपणा आहे.’
त्या पुढे म्हणाल्या, ‘जयदेव ठाकरे हे मोठे बंधू आहेत. आम्ही त्यांचा नेहमीच आदर करत आलेलो आहोत. मात्र काही वर्षांपूर्वी याच जयदेव ठाकरेंनी माध्यमांसमोर आपल्याच वडिलांबाबत आक्षेपार्ह विधाने केली होती. याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना विसर पडला का? ज्या व्यक्तीने बाळासाहेबांच्या विरुद्ध विधाने केली अशा व्यक्तीचा सत्कार केला जात आहे. जयदेव ठाकरे आता समोर आले आहेत मात्र इतके वर्षे ते कुठे होते. याआधी त्यांनी एकनाथ शिंदेंना मार्गदर्शन का केले नाही?’ (हेही वाचा: शिंदे गटाच्या दसरा मेळाव्यात 10 कोटी खर्च करून झाले मनी लाँड्रिंग? CM Eknath Shinde आणि इतरांची चौकशी करण्यासाठी न्यायालयात याचिका दाखल)
शेवटी त्या म्हणाल्या, ‘जयदेव ठाकरे आणि स्मिता ठाकरे यांना साहेबांनी कधीच दूर केले होते. जयदेवने साहेबांना नेहमी मनःस्तापच दिला. आता जेव्हा शिंदे त्यांना जवळ करतात तेव्हा जयदेवच्या राजकीय कर्तुत्वाचा विचार नक्कीच व्हायला हवा. तसेच स्मिता सारख्या एकेकाळच्या कॉंग्रेसप्रेमी व्यक्तीला शिंदेंच्या व्यासपीठावर कशी काय जागा मिळते हेदेखील एकनाथ शिंदे यांनी सांगावे.’